मुंबई : भारतीय शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण पाहायला मिळत आहे. आज सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली आहे. अमेरिकेत एआय संदर्भातील अत्याधुनिक टूलची घोषणा झाल्यानं आयटी कंपन्यांना मोठा फटका बसला आहे. तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअर व्यवसाय असणाऱ्या टेक कंपन्यांना मोठा फटका बसला आहे. भारतीय शेअर बाजारात देखील आयटी कंपन्यांना फटका बसला आहे. 

Continues below advertisement

IT Stocks Crash : आयटी स्टॉक्समध्ये घसरण

निफ्टी  50 आणि सेन्सेक्स मध्ये घसरण सुरु आहे. निफ्टी आयटी निर्देशांकानं  31422 अंकांचा निचांक गाठला होता. बाजार बंद होईपर्यंत 32935.75 अंकावर पोहोचला. निफ्टी आयटी  निर्देशांकात आज 478 अंकांची घसरण झाली आहे.  निफ्टी आयटी निर्देशांक महिनाभरात 5434.95 अंकांची घसरण झाली आहे. म्हणजेच निफ्टी आयटी निर्देशांक महिनाभरात 14.25 टक्क्यांनी घसरला आहे. मार्च 2020 नंतरची ही एका महिन्यातील सर्वात मोठी घसरण आहे. 

निफ्टी आयटी निर्देशांकावरील कोफोर्ज, ओरॅकल फायनान्शिअल सर्व्हिसेस, टीसीएस, एचसीएल टेक्नोलॉजीज, विप्रोच्या शेअरमध्ये 5 टक्क्यांची घसरम झाली आहे. इन्फोसिस, ओरॅकल फायनान्शिअल सर्व्हिसेस, टीसीएस आणि विप्रोनं 52 आठवड्यांचा निचांक गाठला आहे. 

Continues below advertisement

आयटी कंपन्यांच्या स्टॉक्समध्ये झालेल्या घसरणीमुळं त्यांचं बाजारमूल्य आजच्या इंट्राडेच्या निचांकाच्या आधारे पाहिलं असता 3 लाख 11 हजार 873 कोटी रुपयांनी घटलं आहे.

टीसीएस कंपनीला सर्वाधिक फटका बसला असून त्यांचं बाजारमूल्य 128800 रुपयांनी कमी झालं आहे. सध्या टीसीएसचं बाजारमूल्य 9 लाख  35 हजार 253 कोटी रुपये झालं आहे. यामुळं सेन्सेक्सवरील टॉप 10  कंपन्याच्या यादीत टीसीएसची पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे. 

दुसरीकडे इन्फोसिसचं बाजारमूल्य 91431 कोटी रुपयांनी कमी झालं आहे. इन्फोसिसचं बाजारमूल्य 15 टक्क्यांनी कमी झालं आहे. एचसीएल टेक कंपनीचं बाजारमूल्य 53647 कोटी रुपयांनी कमी झालं आहे. याशिवाय विप्रोचं  बाजारमूल्य देखील 22762 कोटी रुपयांनी झालं आहे. तर, टेक महिंद्राचं बाजारमूल्य 15233  कोटी रुपयांनी कमी झालं आहे. भारतातील प्रमुख आयटी कंपन्यांना मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळतंय. 

अँथ्रोपिक पीबीसी कंपनीनं गेल्या आठवड्यात क्लाउड कोवर्क आणि क्लाउड कोड लाँच केल्यानं आयटी क्षेत्राला हादरे बसले आहेत. यामुळं आयटी कंपन्यांवरील अवलंबित्व कमी होण्याची शक्यता आहे. 

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)