Share Market Opening : आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारावर विक्रीचा दबाव असल्याचे संकेत आहेत. शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात निर्देशांक वधारत झाली. मात्र, थोड्याच वेळात घसरण सुरू झाल्याने निर्देशांक घसरला. आशियाई शेअर बाजारातही घसरण सुरू आहे. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे. 


आज शेअर बाजार सुरू झाला तेव्हा बीएसई निर्देशांक सेन्सेक्स 109.61 अंकांनी वधारत 51,470.03 अंकांवर  खुला झाला होता. तर, एनएसई निफ्टी निर्देशांक 41 अंकांनी वधारत 15,334.50 अंकांवर खुला झाला होता. 


प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात दिसत असलेली तेजी काही मिनिटानंतर कमी झाली. विक्रीचा जोर वाढल्याने निफ्टी 15300 अंकांखाली आला. तर, बँक निफ्टीदेखील घसरला होता. सकाळी 9.50 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्समध्ये 190  अंकांची घसरण झाली असून 51,170 अंकांवर व्यवहार सुरू होता. तर, निफ्टीमध्ये 68.85 अंकांची घसरण झाली असून 15,245 अंकांवर व्यवहार करत होता. 


आज एफएमसीजी, फार्मा, आयटी आणि वित्तीय सेवांच्या शेअर्समध्ये तेजी आहे. हेल्थकेअर निर्देशांकातही खरेदीचा जोर असल्याचे दिसत आहे. तर, मेटल इंडेक्समध्ये आज तीन टक्क्यांची मोठी घसरण दिसून आली आहे. मेटल शेअरमध्ये टाटा स्टील, जेएसडब्लू स्टील आणि हिंदाल्को या क्षेत्रांमध्ये घसरण दिसून येत आहे. 


निफ्टी 50 मधील 24 स्टॉकमध्ये खरेदीचा जोर दिसत असून 26 स्टॉकमध्ये घसरण असल्याचे दिसून आले आहे. सन फार्माच्या शेअर दरात 1.88 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर, एचएडीएफसी शेअर दरात 1.36 टक्क्यांनी वाढ झाली आहे. हिंदुस्तान युनिलिव्हरमध्ये 1.35 टक्के आणि एशियन पेंट्सचा शेअर दर जवळपास 1 टक्क्यांनी वाढला आहे. एचडीएफसी बँकेच्या शेअर दरात 0.77 टक्क्यांनी वधारला आहे. 


आज ओएनजीसीच्या शेअर दरात 4.63 टक्के, कोल इंडियाच्या शेअर दरात 3.61 टक्क्यांनी घसरण झाली आहे. टाटा स्टीलमध्ये 3.35 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. तर,जेएसडब्लू स्टीलच्या दरात 1.95 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. हिंदाल्कोमध्ये 1.93 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे.