Share Market Opening Bell: भारतीय शेअर बाजारात आज तेजी राहण्याचे संकेत दिसून येत आहेत. जागतिक पातळीवरील शेअर बाजारातही तेजी दिसून येत आहे. त्याचा सकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहेत. बँक निफ्टीदेखील उच्चांकी पातळीवर दिसून येत आहे. तर, मेटस सेक्टरमध्येही खरेदीचा जोर दिसून येत आहे.
भारतीय शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात झाल्यानंतर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 360.75 अंकांनी वधारत 61,779.71 अंकांवर खुला होता. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (Nifty) 81 अंकांच्या तेजीसह 18,325.20 अंकाच्या पातळीवर खुला झाला. त्यानंतर विक्रीचा दबाव वाढल्याने निर्देशांकात घसरण झाली. सकाळी 9.50 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 135 अंकांनी वधारत 61,554.08 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 40 अंकांच्या तेजीसह 18,284.35 अंकावर व्यवहार करत होता.
बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर बँक निफ्टी 144 अंकांनी वधारत 42,604 अंकांवर व्यवहार करत होता. बँक निफ्टीचा हा आतापर्यंतचा उच्चांक आहे.
सेन्सेक्समधील 30 पैकी 19 कंपन्यांचे शेअर दर तेजीत होते. त्याशिवाय, 11 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून येत आहे. निफ्टी 50 मधील 37 कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसत असून 10 कंपन्यांचे शेअर दर घसरले आहेत. तीन कंपन्यांचे शेअर दर स्थिर आहेत.
शेअर इंडिया उपाध्यक्ष, संशोधन विभागाचे प्रमुख डॉ. रवी सिंह यांनी सांगितले की, आज बाजारातील व्यवहार 18200-18500 दरम्यान व्यवसाय करण्याची शक्यता आहे. बाजारात तेजी दिसू शकते. पीएसयू बँक, मेटल, आयटी, एफएमसीजी, मीडिया आदी कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसण्याची शक्यता आहे. तर, रियल्टी, एनर्जी, वित्तीय सेवा, फार्मा आदी सेक्टरमध्ये विक्रीचा दबाव दिसू शकतो, असे त्यांनी म्हटले.
Inox Green Energy बाजारात सूचीबद्ध
पवन ऊर्जा क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आयनॉक्स ग्रीन एनर्जी कंपनी आज शेअर बाजारात सूचीबद्ध झाली. आयपीओमध्ये शेअर मिळालेल्या गुंतवणूकदारांना लिस्टिंगच्यावेळी चांगला परतावा मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांच्या पदरी निराशा आली. आयनॉक्स ग्रीन एनर्जी आज प्रति शेअर 8 टक्क्यांच्या डिस्काउंट दरावर लिस्ट झाला.
मंगळवारी बाजारात तेजी
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 84 अंकांनी वधारत 61,418 अंकांवर पोहोचला. तर निफ्टीमध्ये 0.46 टक्क्यांची वाढ होऊन तो 18,244 अंकांवर स्थिरावला. बँक निफ्टीमध्येही 110 अंकांची वाढ होऊन तो 42,457 अंकांवर बंद झाला होता.