Share Market Opening Bell: भारतीय शेअर बाजारातील व्यवहारांची सुरुवात आज घसरणीसह झाली. अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने केलेल्या व्याज दरवाढीमुळे अमेरिकन शेअर बाजारात मोठी पडझड झाली. त्याचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. बाजारातील व्यवहार सुरू झाले तेव्हा सेन्सेक्स (Sensex) 60500 अंकांखाली तर निफ्टी (Nifty) 18000 अंकांखाली सुरू झाला.
आज शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 394.52 अंकांच्या घसरणीसह 60,511 अंकांवर खुला झाला. त्यानंतर खरेदीचा जोर दिसू लागला होता. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 114.50 अंकांच्या घसरणीसह 17,968 अंकांवर खुला झाला. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 44 अंकांच्या घसरणीसह 60,862.21 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 15 अंकांच्या घसरणीसह 18,067.15 अंकांवर व्यवहार करत होता.
सेन्सेक्समध्ये टायटन, आयटीसी, अॅक्सिस बँक, मारुती, भारती एअरटेल, सन फार्मा, रिलायन्स इंडस्ट्रीज, डॉ. रेड्डीज लॅब आणि बजाज फायनान्स आदी कंपन्यांच्या शेअर दरात वाढ झाली आहे.
महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, इंडसइंड बँक, टाटा स्टील, एचयूएल, एचडीएफसी बँक, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, एशियन पेंट्स, पॉवरग्रीड, अल्ट्राटेक सिमेंट, एचसीएल टेक, टीसीएस, इन्फोसिस, विप्रो आदी कंपन्यांच्या शेअर दरात घसरण झाली आहे.
शेअर इंडियाचे उपाध्यक्ष आणि संशोधन विभागाचे प्रमुख डॉ. रवी सिंह यांनी म्हटले की, आज बँक निफ्टी 40700-41200 या टप्प्यात व्यवहार करू शकतो. दिवसभरात आज घसरण होण्याची शक्यता आहे. बँकांच्या शेअर दरात घसरण होत असल्याने बँक निफ्टी निर्देशांकात घसरण होत आहे. निफ्टी 18000-18200 च्या टप्प्यात व्यवहार करू शकतो. बाजारात आज विक्रीचा जोर दिसण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. मीडिया, मेटल, फार्मा, एफएमसीजी आणि एनर्जी सेक्टरमधील कंपन्यांच्या शेअर दरात वाढ होण्याची शक्यता आहे.
अमेरिकेत व्याज दरवाढ
महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने व्याज दरात वाढ कतेली आहे. फेडरल रिझर्व्हने व्याज दरात 0.75 टक्क्यांनी वाढ केली आहे. सलग चौथ्यांदा व्याज दरात वाढ करण्यात आली आहे. अमेरिकेत रेपो दर 4 टक्के झाला असून 2008 नंतर हा सर्वाधिक व्याज दर आहे. अमेरिकेत मागील चार दशकातील सर्वाधिक महागाईची नोंद करण्यात आली आहे.