Share Market Opening Bell: भारतीय शेअर बाजारातील व्यवहारांवर आज नफावसुलीचा दबाव दिसत आहे. प्री-ओपनिंग सत्रात सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टीत (Nifty) घसरण झाल्याचे दिसून आले. मात्र, बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर खरेदीचा जोर दिसल्याने बाजार सावरला. सेन्सेक्स घसरणीसह (Sensex Fall) खुला झाला. तर निफ्टी किंचिंत वधारत खुला झाला. जागतिक पातळीवरील शेअर बाजारातून भारतीय शेअर बाजाराला (India Share Market) फारसा प्रतिसाद लाभत नसल्याचे दिसून आले.
सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकात विक्रीचा दबाव असल्याचे दिसून येत आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (BSE) सेन्सेक्स 29.18 अंकांच्या घसरणीसह 61,765.86 अंकांवर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (NSE) निफ्टी 26.70 अंकांनी वधारत 18,376.40 अंकांवर खुला झाला. सकाळी 10.50 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 46.43 अंकांच्या घसरणीसह 61,748.61 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी निर्देशांक 14.30 अंकांच्या तेजीसह 18,364.00 अंकावर व्यवहार करत होता.
सकाळच्या सुमारास, सेन्सेक्समधील 30 पैकी 19 कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसत आहे. तर, 11 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसत आहे. निफ्टीमध्ये 50 पैकी 31 कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली होती.
सेन्सेक्समध्ये पॉवरग्रीड, टाटा स्टील, कोटक महिंद्रा बँक, एचसीएल टेक, टेक महिंद्रा, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, एनटीपीसी, टीसीएस, अल्ट्राटेक सिमेंट, इन्फोसिस, विप्रो आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, मारुती, भारती एअरटेल, बजाज फायनान्स, अॅक्सिस बँक, एशियन पेंट्स, एचडीएफसी आणि नेस्लेच्या शेअर दरात तेजी दिसून आली.
'शेअर इंडिया'चे उपाध्यक्ष, संशोधन विभाग प्रमुख डॉ. रवी सिंह यांनी म्हटले की, 18200-18500 अंकांच्या दरम्यान बाजार व्यवहार करण्याची शक्यता आहे. बाजारात आज चढ-उतार दिसण्याची शक्यता आहे. रियल्टी, आयटी, बँक, वित्तीय सेव३ा आणि मीडियाच्या शेअरमध्ये खरेदीचा जोर दिसू शकतो. तर, ऑटो, पीएसयू बँक, एनर्जी, इन्फ्रा आणि फार्माच्या शेअर दरात घसरण दिसू शकते.
प्री-ओपनिंग सत्रात बाजार कसा होता?
शेअर बाजारात प्री-ओपनिंग सत्रात घसरण दिसून आली होती. सेन्सेक्स निर्देशांक 345 अंकांच्या घसरणीसह 61449.77 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 67.40 अंकांच्या घसरणीसह 18282.30 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता. SGX Nifty देखील प्री-ओपन मार्केटमध्ये 19 अंकांच्या तेजीसह 18452.50 अंकांवर व्यवहार करत होता.