मुंबई : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी 2026 पहिल्या दोन दिवसात देखील भारतीय बाजारातून पैसे काढून घेतले आहेत. विदेशी गुंतवणूकदारांची नववर्षात देखील सावध भूमिका पाहायला मिळतेय. 2025 मध्ये विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातील शेअर्सची विक्री करत पैसे काढून घेतले होते. जानेवारीतील पहिल्या दोन दिवसात भारतीय इक्विटी मार्केटमधून एफपीआयनं 7608 कोटी रुपये काढून घेतले आहेत. 

विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी 2025 मध्ये भारतीय बाजारातून 1.66 लाख कोटी रुपये काढून घेतले होते. अस्थिरता, जागतिक व्यापार तणाव आणि अमेरिकेचं संभाव्य टॅरिफ या कारणांमुळं आणि वाढलेल्या बाजारमूल्यामुळं भारतीय शेअर बाजारातून विदेशी गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेतले. 

विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी 2025 चा ट्रेंड नववर्षात देखील कायम ठेवला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य 2025 मध्ये  5 टक्क्यांनी घटलं आहे. बाजार जाणकारांच्या मते 2026 मध्ये ही स्थिती बदलू शकते. 

वृत्तसंस्था पीटीआयनुसार जिओजित इनवेस्टमेंटसचे मुख्य गुंतवणूक रणनीतीकार वीके विजयकुमार यांच्या मते 2026 मध्ये हे चित्र बदलू शकतं. याच कारण 2026 मध्ये विदेशी गुंतवणूकदारांना भारतीय कंपन्या आकर्षित करुन शकतात. मजबूत जीडीपी ग्रोथ आणि कंपन्यांच्या कमाई वाढीची शक्यता यामुळं एफपीआयकडून गुंतवणूक केली जाऊ शकते, त्यासाठी सकारात्मक संकेत असल्याचं वीके विजयकुमार म्हणाले. 

एंजेल वनचे वरिष्ठ फंडामेंटल विश्लेषक वकार जावेद खान यांनी भारत-अमेरिका व्यापार संबंध सामान्य होणं, वैश्विक व्याज दराचा सकारात्मक परिणाम, डॉलर-रुपयात स्थिरता  राहिल्यास विदेशी गुंतणूकदारांसाठी सकारात्मक स्थिती बून शकते. गेल्या वर्षीच्या तुलनेत इक्विटीचं मूल्यांकन स्थिर झालं आहे. यामुळं इनफ्लो वाढू शकतो, असं वकार जावेद खान म्हणाले.

शुक्रवारी म्हणजेच 2 जानेवारी 2026 निफ्टीमध्ये  182 अंकांची वाढ झाली आहे. निफ्टीनं 26325 अंकांचा उच्चांक गाठला. तर, सेन्सेक्समध्ये 573 अंकांची तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स 85762 अंकांवर बंद झाला.   

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)