मुंबई : भारतीय शेअर बाजारात सोमवारी (5 जानेवारी ) रोजी संमिश्र स्थिती पाहायला मिळाली. सुरुवातीच्या तेजीनंतर विक्रीचा ट्रेंड सुरु झाल्यानं बाजारात घसरण सुरु झाली. सेन्सेक्स 322 अंकांनी घसरला तर निफ्टीमध्ये दखील 78.25 अंकांची घसरण झाली. आयटी कंपन्यांच्या शेअरमधील विक्री आणि वाढत्या भू-राजनैतिक संघर्षामुळं गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर परिणाम झाला. बीएसईवर सेन्सेक्सवर 322.39 अंकांची घसरण होऊन निर्देशांक 85439.62 अंकांवर पोहोचला. तर, निफ्टीमध्ये 78.25 अंकांची घसरण होऊन ते 26250.30 अंकांवर बंद झाले.
Share Market Update : शेअर बाजारातील घसरणीची कारणं?
भारतीय शेअर बाजारातील घसरणीची प्रमुख कारणं आयटी कंपन्यांच्या शेअरमधील विक्री, ट्रम्प यांची टॅरिफबाबतची नवी धमकी आणि रुपया कमजोर होणं ही आहेत.
आयटी क्षेत्रातील कंपन्यांच्या स्टॉकची जोरदार विक्री झाल्याचं पाहायला मिळालं. निफ्टी आयटी निर्देशांकात 2 टक्क्यांची घसरण झाली. निर्देशांकातील सर्व 10 शेअर घसरणीसह बंद झाले. विप्रो, एचसीएल टेक आणि इन्फोसिसच्या शेअरमध्ये 3 टक्क्यांची घसरण झाली. अमेरिकेतील बाजाराशी संबंधित जोखीम आणि नव्यानं अतिरिक्त टॅरिफ ट्रम्प यांच्याकडून लादलं जाण्याची शक्यता आहे. ब्रोकरेज फर्म सीएलएसएनं भारताच्या आयटी सेक्टरबाबत सतर्क राहण्याचा सल्ला गुंतवणूकदारांना देत भागीदारी कमी करण्यास सूचवलं. आयटी कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीतील अकडे कमजोर असू शकतात, असं CLSA नं म्हटलं.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका व्यक्तव्यामुळं बाजारावर परिणाम झाला. ट्रम्प म्हणाले भारत अजूनही रशियाकडून तेल खरेदी करत आहे, त्यामुळे अमेरिका खूश नाही, गरज पडल्यास भारतावरील टॅरिफ वाढवलं जाऊ शकतं. गुंतवणूकदारांच्या मते अशा वक्तव्यामुळं अनिश्चिचता वाढते आणि जोखीम घेण्याची भावना कमी होते. जिओजित इन्वेस्टमेंटसचे मुख्य रणनीतीकार वी के विजयकुमार यांनी म्हटलं की 2026 ची सुरुवात नव्या भू राजनैतिक घटनांसह झाला ज्याचा परिणाम जागतिक बाजारावर परिणाम होऊ शकतो.
रुपया कमजोर होणं
डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर झाल्यानं बाजारावर त्याचा परिणाम दिसून ला. आज रुपया 4 पैसे कमजोर होऊन 90.24 रुपये प्रति डॉलरवर पोहोचला होता. डॉलरची मागणी जास्त असल्यानं त्याचा दबाव रुपयावर दिसून आला.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
