Share Market Crash नवी दिल्ली: भारतीय शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. सोमवारी शेअर बाजारातील घसरणीमुळं गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटींचे नुकसान झाले होते. आज देखील भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टी कोसळले आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळं क्रूड ऑईलचे दर वाढले. यामुळं भारतीय शेअर बाजाराला फटका बसला आहे. सेन्सेक्स 464 अंकांनी घसरला तर निफ्टी देखील 23700 च्या खाली आला आहे. निफ्टी मिडकॅप 100 आणि निफ्टी स्मॉलकॅप 100 मध्ये घसरण झालीय. इंट्रा डे ट्रेडिंगमध्ये सेन्सेक्स 464.33 अंकांनी घसरला तर निफ्टी देखील 23675.15 वर आला होता.  

Continues below advertisement

Share Market Crash:शेअर बाजारातील घसरणीची कारणं

कच्चा तेलाच्या दरात वाढ

अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव वाढल्यानं कच्चा तेलाचे दर वाढले आहेत. यामुळं शेअर बाजाराला फटका बसतोय. ब्रेंट क्रूडच्या दरात 1 टक्के वाढ होऊन ते 98 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत. नव्यानं हल्ला झाल्यास अमेरिकेशी संबंधित ऊर्जा केंद्रांवर हल्ले करु अशी धमकी इराणकडून देण्यात आली आहे. यामुळं पश्चिम आशियात तणाव वाढला आहे. खासगी बँका आणि ऑटो सेक्टरमुळं बाजारावर दबाव

शेअर बाजारात आज खासगी बँका आणि ऑटो सेक्टरमधील शेअरमधील घसरणीमुळं दबाव वाढला. निफ्टी प्रायवेट बँक आणि निफ्टी ऑटोमध्ये घसरण झाली आहे.

Continues below advertisement

India VIX मध्ये वाढ

बाजारातील जोखीम मोजणाऱ्या वोलॅटिलिटी इंडेक्स इंडिया विक्समध्ये वाढ झाल्यानं मार्केटवर दबाव वाढला आहे. सध्या VIX निर्देशांक 0.60 टक्क्यांची वाढ होऊन 11.23 वर पोहोचला आहे.यामध्ये वाढ झाल्यानं शॉर्ट टर्ममध्ये अस्थिरता वाढण्याची शक्यता आहे.  

टेक्निकल कारणं 

तज्ज्ञांच्या अंदाजानुसार बाजारात पुन्हा बुलिश मोमेंटम मिळवण्यासाठी निफ्टीनं 23800 लेव्हल पार करावी लागेल. चॉइस ब्रोकिंग प्रायवेट लिमिटेडच्या टेक्निकल रिसर्च विश्लेषक हितेश टेलर यांच्या मते 23,650-23,700 चा तात्काळ सपोर्ट दिसतोय. हितेश टेलर यांच्या मते सपोर्ट झोन दिसून येतोय. निफ्टी पुन्हा मजबूत करु शकतो. निफ्टी 23650 पेक्षा खाली गेल्यास आणखी घसरण येऊ शकते.  

निफ्टीमध्ये गेल्या महिन्यात 1000 अंकांची घसरण 

शेअर बाजारातील घसरणीमुळं निफ्टी 50 मध्ये गेल्या महिन्यात 1000 अंकांची घसरण झाली आहे. 24775 अंकांवरुन निफ्टी 50  निर्देशांक 23775 अंकांपर्यंत खाली आला आहे.  

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)