Share Market Closing Bell : शेअर बाजारातील आठवड्यातील व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी (Share Market Closing Bell) निर्देशांक किंचीत वधारत बंद झाला. सकाळी बाजार सुरू झाला तेव्हा चांगला वधारला होता. आरबीआयने रेपो दर (RBI Repo Rate) जाहीर केल्यानंतर बाजारात खरेदी दिसून आली. दुपारच्या सत्रात नफावसुली सुरू झाल्याने बाजार घसरला.  आज व्यवहार थांबले तेव्हा सेन्सेक्स निर्देशांक 89 अंकांनी, तर निफ्टी 15.50 अंकांनी वधारत बंद झाला.


आज शेअर बाजारातील व्यवहार थांबले तेव्हा सेन्सेक्स निर्देशांक 58,387 अंकांवर आणि निफ्टी  17,397 अंकांवर बंद झाला. शेअर बाजारातील 1807 स्टॉक्सच्या शेअर दरात वाढ झाली. तर 1466 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण झाली. बाजारातील 144 कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही. निफ्टीतील 50 पैकी 28 शेअरमध्ये तेजी दिसून आली. तर, 22 शेअरमध्ये घसरण दिसून आली. सेन्सेक्समधील 30 पैकी 16 शेअरच्या दरात वाढ झाली. तर, 14 शेअरच्या दरात घसरण झाली. 


अल्ट्राटेक सिमेंट, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेलच्या शेअर दरात वाढ झाली. तर, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि मारुती सुझुकीच्या शेअर दरात घसरण झाली. अल्ट्राटेक सिमेंटच्या शेअर दरात 2.86 टक्के, आयसीआयसीआय बँकेच्या शेअर दरात 2.26 टक्के, भारती एअरटेल 1.30 टक्के, पॉवर ग्रीडमध्ये 1.20 टक्के, इन्फोसिसमध्ये 1.06 टक्के वाढ झाली. अॅक्सिस बँकेच्या शेअरच्या दरात 0.87 टक्के, एनटीपीसीच्या शेअर दरात 0.71 टक्क्यांची वाढ झाली आहे. 


ऊर्जा आणि ऑटो क्षेत्रातील शेअर दरात घसरण नोंदवण्यात आली. तर, वित्तीय सेवा आणि आयटी क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी दिसून आली.