Share Market Closing Bell: मागील आठवड्यातील तीन दिवस बाजारात मोठी घसरण दिसून आली होती. नाताळाच्या सुट्टीनंतर सुरू झालेल्या बाजारात आज गुंतवणूकदारांचा सेलिब्रेशन मूड दिसला. गुंतवणूकदारांनी केलेल्या खरेदीमुळे बाजारात तेजी दिसून आली. सेन्सेक्स निर्देशांकाने (BSE Sensex) 60 हजार अंकांचा टप्पा ओलांडला. तर, निफ्टीने (NSE Nifty)18 हजार अंकांचा टप्पा ओलांडण्यास यश मिळवले. आज शेअर बाजारातील व्यवहार तेजीसह बंद झाले. 


मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 704 अंकांची तेजी दिसून आली. सेन्सेक्स 60,555 अंकांवर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 200 अंकांच्या तेजीसह 18006 अंकांवर स्थिरावला. 


फार्मा आणि हेल्थकेअर समभाग वगळता इतर सर्व क्षेत्रातील समभाग वधारत बंद झाले. बँकिंग सेक्टरमध्ये खरेदीचा उत्साह दिसून आला. बँक निफ्टी 2.31 टक्क्यांनी वधारत बंद झाला. बँक निफ्टीतील तेजीने शेअर बाजाराचे निर्देशांक वधारले.


 निफ्टी आयटी, निफ्टी ऑटो, निफ्टी पीएसयू बँक, निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी मेटल्स देखील तेजीसह बंद झाले आहेत. आजच्या ट्रेडिंग सत्रात मिडकॅप आणि स्मॉल कॅप समभागांमध्येही चांगली वाढ झाली आहे.  निफ्टी 50 मधील फक्त 11 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली. तर, 39 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 25 कंपन्यांचे शेअर दर वधारले. तर, 5 कंपन्यांचे शेअर दर घसरले. 


आज शेअर बाजारात झालेल्या व्यवहारात इंडसइंड बँकेच्या शेअर दरात 3.99 टक्क्यांची तेजी दिसून आली. तर, एसीआयच्या शेअर दरात 3.97 टक्के, टाटा स्टीलच्या दरात 2.74 टक्के, बजाज फिनसर्व्हच्या शेअर दरात 2.53 टक्के, आयटीसीच्या शेअर दरात 2.51 टक्के, अॅक्सिस बँकेच्या शेअर दरात 2.44 टक्के, अल्ट्राटेक सिमेंटच्या शेअर दरात 1.98 टक्के, एचडीएफसी बँकेच्या शेअर दरात 1.91 टक्के, टाटा मोटर्सच्या शेअर दरात 1.73 टक्क्यांची तेजी दिसून आली. 


शेअर बाजारात आज दिसून आलेल्या खरेदीच्या उत्साहामुळे मुंबई शेअर बाजाराचे मार्केट कॅपिटल वाढले. आज 5.87 लाख कोटींची वाढ दिसून आली. आजच्या व्यवहारानंतर मार्केट कॅपिटल 277.99  लाख कोटी रुपये इतके झाले. 


दरम्यान, शेअर बाजारातील व्यवहार सुरू होताच, सेन्सेक्स निर्देशांक 90.21 अंकाच्या घसरणीसह  59,755.08 अंकांवर खुला झाला. तर, निफ्टी निर्देशांक (NSE Nifty) 23.6 अंकांनी वधारत  17,830.40  अंकांवर खुला झाला. त्यानंतर बाजारात खरेदीचा जोर वाढल्याने तेजी दिसून आली. 


शेअर बाजारातील प्री-ओपनिंग सत्रात संमिश्र चित्र दिसून आले. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 16.365 अंकांनी वधारत 17823.15 अंकांवर व्यवहार करत होता. तर, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 80.47 अंकांच्या घसरणीसह  59764.82 अंकांच्या पातळीवर होता.