Share Market Closing Bell: भारतीय शेअर बाजारात (Share Market) नव्या वर्षाच्या पहिल्या दोन दिवशी खरेदीचा जोर दिसून आला होता. त्यानंतर आज गुंतवणूकदारांकडून जोरदार नफावसुली झाली. या नफावसुलीमुळे बाजारात मोठी घसरण दिसून आली. निफ्टी निर्देशांक (NSE Nifty) 18100 अंकाखाली घसरला. तर, सेन्सेक्स निर्देशांक (BSE Sensex) 61000 अंकांखाली आला. 


आजच्या दिवसातील व्यवहार बंद झाले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 651.61 अंकांच्या घसरणीसह 60,642.59 अंकांवर व्यवहार स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 202 अंकांच्या घसरणीसह 18,030.55 अंकांवर स्थिरावला. 


सेन्सेक्समधील 30 पैकी फक्त दोन कंपन्यांमध्ये तेजी दिसून आली. तर, निफ्टी निर्देशांकातील 50 पैकी 5 कंपन्यांच्या शेअर दरात खरेदीचा जोर दिसला. तर, 45 कंपन्यांचे शेअर दर घसरले. 


आज शेअर बाजारात झालेल्या घसरणीचा परिणाम सर्वच सेक्टरवर झाला.  बँक निफ्टीत 1.07 टक्क्यांची घसरण झाली. तर, एनर्जी सेक्टरमध्ये 1.54 टक्के, एफएमसीजीमध्ये 0.66 टक्के, मेटल्समध्ये 2.11 टक्क्यांची घसरण दिसून आली.


आज दिवसभरातील व्यवहारात निफ्टीतील डिव्हीज लॅब, एचडीएफसी लाइफ, मारुती, डॉ. रेड्डीज लॅब, आयशर मोटर्स  आदी शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर, जेएसडब्लू स्टील, हिंदाल्को, कोल इंडिया, टाटा स्टील, ओएनजीसीच्या शेअर दरात घसरण दिसून आली. 


बँक निफ्टीत घसरण 


बँक निफ्टीत आज घसरण दिसून आली. बँक निफ्टी निर्देशांक 466.45 अंकांच्या घसरणीसह 42,958.80 अंकावर स्थिरावला. बँक निफ्टीने आज दिवसभरात 43,578.40 अंकांचा उच्चांक गाठला होता. आज बँक निफ्टी निर्देशांक 43,417.50 अंकांवर खुला झाला. 


3 लाख कोटींचा चुराडा 


या  2023 वर्षात पहिल्यांदाच शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. बाजारात झालेल्या घसरणीमुळे मुंबई शेअर बाजाराचे बाजार भांडवलही घटले. आज मुंबई शेअर बाजाराचे बाजार भांडवल 281.61 लाख कोटी इतके झाले. मंगळवारी 284.65 लाख कोटी इतके बाजार भांडवल होते. आज गुंतवणूकदारांच्या 3.04 लाख कोटींचा चुराडा झाला. 


सकाळी घसरणीसह सुरुवात


दरम्यान, आज शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स 61294 अंकांवर वर आणि निफ्टी (Nifty 50) 18230 अंकांवर उघडला. सेन्सेक्समध्ये 75 अंकांपेक्षा जास्त घसरण नोंदवण्यात आली होती. सुरुवातीच्या व्यवहारात बाजारात विक्रीचा दबाव आहे. दबाव असूनही इंडसइंड बँक, अॅक्सिस बँक, सन फार्मा, महिंद्रा अँड महिंद्रा आणि एसबीआय, हिंदुस्थान युनिलिव्हर या शेअर्स तेजीत व्यवहार करत होते.