Share Market Closing Bell: आठवड्यातील व्यवहाराच्या शेवटचा दिवस भारतीय शेअर बाजारासाठी निराशाजनक राहिला. जागतिक घडामोडी आणि गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर विक्रीमुळे बाजारात मोठी घसरण झाली. आजच्या घसरणीनंतर सेन्सेक्स 59000 अंकांखाली आहे. आज बाजारातील व्यवहार थांबले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 1093 अंकांच्या घसरणीसह 58,840 अंकांवर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीत (Nifty) 345 अंकांची घसरण झाली. निफ्टी 17530 अंकांवर बंद झाला.
शुक्रवारी, शेअर बाजारात आज विक्रीचा दबाव दिसून आला. दिवसभर झालेल्या चौफेर विक्रीमुळे सर्वच सेक्टरमध्ये घसरण झाली. गुरुवारी उच्चांक गाठणाऱ्या बँक निफ्टी निर्देशांकात आज 1.05 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली. निफ्टी ऑटोमध्ये 2.71 टक्के, निफ्टी आयटीमध्ये 3.71 टक्के, निफ्टी एफएमसीजीमध्ये 1.93 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. ऑईल अॅण्ड गॅस सेक्टर, ग्राहकोपयोगी वस्तूंच्या शेअर दरात घसरण दिसून आली. निफ्टीतील 50 पैकी फक्त 2 शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर, उर्वरित 48 शेअर्समध्ये घसरण दिसून आली. सेन्सेक्समधील 30 पैकी फक्त एका शेअरमध्ये तेजी दिसून आली. उर्वरित 29 शेअर्समध्ये घसरण दिसली.
आज झालेल्या व्यवहारानंतर मुंबई शेअर बाजारात आज 3610 कंपन्यांपैकी 980 कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी दिसली. तर, 2525 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. 105 कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही.
आज दिवसभरातील व्यवहारात इंडसइंड बँक 2.63 टक्के, डेल्टा कॉर्प 1.83 टक्के, मॅक्स फायनान्शियल 1.22 टक्के, सिप्ला 0.99 टक्के, गेल 0.77 टक्के, इंडस टॉवर 0.22 टक्क्यांच्या तेजीसह बंद झाले.
तर, अल्ट्राटेक सिमेंट 4.51 टक्के, टेक महिंद्रा 445 टक्के, इन्फोसिस 3.69 टक्के, महिंद्रा 3.52 टक्के, विप्रो 3.19 टक्के, टीसीएस 3.08 टक्के, नेस्ले 3.02 टक्के, रिलायन्स 2.44 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला.
शेअर बाजारातील व्यवहाराची आजची सुरुवात घसरणीने झाली. नफावसुलीमुळे विक्रीचा दबाव दिसत असून सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी (Nifty) निर्देशांकात घसरण झाली आहे. गुरुवारी उच्चांक गाठणाऱ्या बँक निफ्टीत आज घसरण दिसून आली आहे. त्याशिवाय, स्मॉल कॅप आणि मिड कॅपमध्येही घसरण विक्रीचा दबाव दिसून आला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असलेला सेन्सेक्स 348.29 अंकांच्या घसरणीसह 59,585.72 अंकांवर खुला झाला आहे. तर निफ्टी निर्देशांक 80.602 अंकांच्या घसरणीसह 17,796.80 अंकांवर खुला झाला होता.