मुंबई: शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस अत्यंत निराशाजनक राहिला. बाजारात आज मोठी घसरण झाल्याने गुंतवणूकदारांचे तब्बल 6.36 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. मार्च 2020 नंतर इन्ट्रा-डे मध्ये पहिल्यांदाच एवढी मोठी घसरण झाली आहे. आज शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 1416 अंकांनी घसरला आहे तर निफ्टीही 430 अंकानी घसरला आहे. सेन्सेक्समध्ये 2.61 टक्क्यांची घसरण होऊन तो 52,792 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 2.65 टक्क्यांची घसरण होऊन तो 15,809 वर पोहोचला आहे. 


सेन्सेक्ससोबत निफ्टीमध्येही मोठी घसरण झाली आहे. 24 फेब्रुवारीनंतर पहिल्यांदाच निफ्टीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर घसरण झाली आहे. आजच्या घसरणीनंतर शेअर बाजारातून तब्बल 6.36 लाख कोटी रुपये पाण्यात गेले आहेत. त्यामुळे शेअर बाजारातील एकूण भांडवल हे 255.7 लाख कोटीवरुन 249.40 लाख कोटी रुपयांवर आलं आहे. 


ITC या एकमेव शेअर्समध्ये आज वाढ झाल्याचं दिसलं. या कंपनीच्या शेअर्समध्ये 3.43 टक्क्यांची वाढ झाली आहे. ITC कंपनीने बुधवारी मार्च तिमाहीचा अहवाल जारी केला. त्याचा परिणाम आज त्या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्यावर झाला. Dr Reddy's Laboratories आणि Power Grid Corporation या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये काहीशी वाढ झाली आहे.


मेटल आणि आयटी क्षेत्राला आज मोठा फटका बसला असून त्यांच्या शेअर्समध्ये 4 ते 5 टक्क्यांची घसरण झाली आहे. निफ्टी बँक निर्देशांक 884 अंकांनी घसरला तर निफ्टी आयटी निर्देशांक मागील दोन वर्षातली सर्वात मोठी घसरण झाल्याचं दिसून आलं आहे. जागतिक शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात समभागांची विक्री, गुंतवणूकदारांकडून शेअर बाजारातून पैसे काढून घेण्याचा सपाटा आणि भारतीय शेअर बाजारात झालेली समभागांची मोठ्या प्रमाणात विक्री यामुळे आज शेअर बाजार कोसळला आहे. 


डॉलरच्या तुलनेत रुपयाची सुरू असलेली घसरण आजही कायम आहे. आजही रुपया घसरला असून डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत ही 77.75 इतकी झाली आहे.