मुंबई :  भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी आज गुरुवारचा दिवस काहीसा निराशाजनक राहिला. बाजारातील व्यवहार सुरू झाले तेव्हा सकाळच्या सत्रात तेजी दिसून आली होती. मात्र, त्यानंतर गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावल्याने बाजारात घसरण झाली. त्याच्या परिणामी सेन्सेक्स (Sensex) हा दिवसभरातील 650 अंकांच्या उच्चाकांपासून तर निफ्टी (Nifty) 200 अंकांच्या उच्चाकांपासून घसरला. आज दिवसभरातील व्यवहार संपले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (BSE Sensex) 181 अंकांच्या घसरणीसह 65,252 अंकांवर स्थिरावला. तर, निफ्टी (NSE Nifty) 57.30 अंकांच्या घसरणीसह 19,386 अंकांवर बंद झाला. अमेरिकेत शुक्रवारी मध्यवर्ती बँकेची बैठक होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर आज बाजार सावध पवित्र्यात राहिला असल्याचे दिसले.  


कोणत्या सेक्टरमध्ये चढ-उतार?


आजच्या व्यवहारात बँकिंग, आयटी, एफएमसीजी, क्षेत्रातील शेअर्स घसरले. तर ऑइल अॅण्ड गॅस, ऑटो, हेल्थकेअर, ग्राहकोपयोगी वस्तू, एनर्जी, मेटल आणि फार्मा शेअर्समध्येदेखील विक्रीचा सपाटा दिसून आला. मिड-कॅप सेक्टरमध्ये तेजी दिसून आली तर, स्मॉल कॅप स्टॉक्समध्ये घसरण दिसून आली. सेन्सेक्स निर्देशांकातील 30 कंपन्यांपैकी 10 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर निफ्टी निर्देशांकातील 50 कंपन्यांपैकी 17 कंपन्यांचे शेअर्स तेजीसह  स्थिरावले. 


आजच्या व्यवहारात इंडसइंड बँकेच्या शेअर दरात 1.72 टक्क्यांनी वाढ झाली. तर,  एशियन पेंट्स 1.68 टक्के, इन्फोसिसमध्ये 1.19 टक्के, अल्ट्राटेक सिमेंट 0.65 टक्के, नेस्ले 0.39 टक्के, अॅक्सिस बँकेच्या शेअर दरात 0.33 टक्के, आयसीआयसीआय बँक 0.28 टक्के, एचयूएलमध्ये 0.24 टक्के, बजाज फायनान्समध्ये 0.23 टक्क्यांची तेजी दिसून आली. तर, रिलायन्सच्या शेअर दरात 1.76 टक्क्यांची घसरण दिसून आली. त्याशिवाय, पॉवरग्रीडमध्ये 1.32 टक्के, जेएसडब्लू स्टील 1.19 टक्के, लार्सनमध्ये 1.10 टक्के, एचसीएल टेकमध्ये 0.92 टक्क्यांची घसरण दिसून आली. 


गुंतवणूकदारांचे 38 हजार कोटी रुपये बुडाले


मुंबई शेअर बाजारावर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांच्या बाजार भांडवल आजच्या घसरणीमुळे कमी झाले आहे. आज, गुरुवारी मुंबई शेअर बाजाराचे बाजार भांडवल 308.63 लाख कोटी रुपयांवर आले. बुधवारी, 23 ऑगस्ट रोजी हे बाजार भांडवल 309.01 लाख कोटी रुपये होते. याचाच अर्थ मुंबई शेअर बाजाराच्या बाजार भांडवलात आज सुमारे 38 हजार कोटींची घसरण दिसून आली आहे. 


1827 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण


मुंबई शेअर बाजारामध्ये (BSE) घसरणीसह बंद झालेल्या शेअर्सची संख्या अधिक आहे. एक्सचेंजमध्ये आज एकूण 3,780 कंपन्यांच्या शेअर्सचे व्यवहार झाले. यातील 1,789 शेअर्स तेजीसह बंद झाले. त्याच वेळी, 1,827 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. तर 165 शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही. आजच्या व्यवहारादरम्यान 264 कंपन्यांच्या शेअर दराने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. तर, 23 कंपन्यांच्या शेअर्सने  52 आठवड्यांचा नीचांक गाठला. आजच्या व्यवहारात 5 कंपन्याच्या शेअरने दराने अप्पर सर्किट गाठले. तर 5 कंपन्यांच्या शेअर दरांना लोअर सर्किट लागले.