Share Market Update मुंबई : भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी नफा कमावण्यासाठी विक्रीचं धोरण राबवल्यानं सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये  घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स 1342 अंकांनी घसरुन 76863.71 अंकांवर बंद झाला. तर, नॅशनल स्टॉक एक्सचेंज  395 अंकांनी घसरुन 23866.85 अंकांवर बंद झाला. बीएसई 150 मिडकॅप निर्देशांक आणि बीएसई 250 स्मॉलकॅप निर्देशांकात देखील घसरण पाहायला मिळाली. 

Continues below advertisement

भारतीय शेअर बाजारातील आजच्या घसरणीमुळं नफा वसुली करणारे गुंतवणूकदार वगळता इतर गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं आहे. बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य मंगळवारी  10 मार्चला 447 लाख कोटी रुपयांवर होतं. त्यामध्ये घसरण होऊन ते  441 लाख कोटींवर आलं. म्हणजेच गुंतवणूकदारांचं एकूण 6 लाख कोटी रुपयांचं नुकसान एका दिवसात झालं आहे. 

बँकिंग आणि वित्तीय स्टॉक्सची विक्री करुन काही गुंतवणूकदारांना नफा मिळवण्याचं धोरण ठेवल्यानं एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक आणि बजाज फायनान्सच्या शेअरमध्ये घसरण झाली. निफ्टी बँक निर्देशांक देखील 1.7 टक्क्यांनी घसरला आहे. भारती एअरटेल, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि महिंद्रा अँड महिंद्राच्या स्टॉकमध्ये  घसरण झाली.

Continues below advertisement

अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळं निर्माण झालेल्या भूराजनैतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांकडून नफा वसूल करण्याचं धोरण राबवलं जात आहे.

शेअर बाजारातील घसरणीचं आणखी एक कारण म्हणजे रुपया कमजोर होणे. रुपया 17 पैशांनी कमी होऊन डॉलरच्या तुलनेत 91.97 रुपयांवर  आला. 

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका आणि इराण युद्ध लवकर संपण्याची अपेक्षा व्यक्त केली. मात्र, इराणकडून कडवा प्रतिकार सुरु असल्यानं देखील युद्ध कधी संपणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

विदेशी गुंतवणूकदारांचं विक्रीचं सत्र (FII Sale)

विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी मार्च महिन्यातील 6 बाजार सत्रात 32800 कोटी रुपयांच्या स्टॉक्सची विक्री करुन पैसे काढून घेतले आहेत. गेल्या वर्षी जुलै 2025 मध्ये सुरु झालेला शेअर बाजारातून पैसे काढून घेण्याचा विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा ट्रेंड अद्याप कायम आहे.  याशिवाय भारतीय शेअर बाजारातील घसरणीचं आणखी एक कारण म्हणजे क्रूड ऑईलच्या दरातील अनिश्चिचतता हे देखील आहे.याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर होतोय.       

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)