मुंबई :  भारतीय शेअर बाजारात आज पुन्हा एकदा घसरण दिसून आली. गुरुवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये (BSE Sensex) 570 अंकांची घसरण दिसून आली. तर, निफ्टीतही (NSE Nifty) घसरण होऊन 19,750  अंकांवर स्थिरावला. मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप (Mid Cap) आणि स्मॉल कॅप (Small Cap) शेअर्स इंडेक्समध्येही जवळपास एक टक्क्यांची घसरण दिसून आली.  आजच्या घसरणीमुळे भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला. 


सलग तीन ट्रे़्डिंग सत्रात भारतीय शेअर बाजारात विक्रीचा सपाटा दिसून आला. अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने घेतलेल्या निर्णयाने बाजारावर त्याचा परिणाम दिसून आला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 570.60 अंकांच्या घसरणीसह  66,230.24  अंकांवर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 152.25 अंकांनी घसरून 19,749.15 अंकांवर बंद झाला. 


सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 24 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. तर, निर्देशांकातील 50 पैकी 34 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली. 


महिंद्रा अॅण्ड महिंद्राच्या शेअर दरात 2.88 टक्क्यांची घसरण दिसून आली. आयसीआयसीआय बँकेच्या शेअर दरात 2.81 टक्क्यांची, सिप्लामध्ये 2.47 टक्क्यांची घसरण झाली आहे. एसबीआयच्या शेअर दरात 2.20 टक्के, इंडसइंड बँकेच्या शेअर दरात 2.04 टक्क्यांची घसरण दिसून आली. 


टेक महिंद्राच्या शेअर दरात 1.47 टक्क्यांची तेजी दिसून आली. त्याशिवाय, भारती एअरटेल, एशियन पेंट्स, इन्फोसिस आणि हिंदुस्तान युनिलिव्हरच्या शेअर दरात तेजी दिसून आली. 


गुंतवणूकदारांना 2.45 लाख कोटींचा फटका 


मुंबई शेअर बाजारावर (BSE) सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 21 सप्टेंबर रोजी 318.06 लाख कोटी रुपये झाले. बुधवार, 20 सप्टेंबर रोजी बाजार भांडवल 320.51 लाख कोटी रुपये इतके झाले. आजच्या घसरणीमुळे मुंबई शेअर बाजारामध्ये सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे बाजार भांडवल सुमारे 2.45 कोटी रुपयांनी घटले आहे.  


2337 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण 


मुंबई शेअर बाजारावर (BSE) आज घसरणीसह बंद झालेल्या शेअर्सची संख्या अधिक नोंदवण्यात आली. एक्सचेंजमध्ये आज एकूण 3,793 शेअर्सचे व्यवहार झाले. यापैकी 1317 कंपन्यांचे शेअर्स तेजीसह बंद झाले. तर, 2337 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. तर 139 कंपन्यांच्या शेअर्स दरात कोणताही बदल झाला नाही. याशिवाय आजच्या व्यवहारादरम्यान 177 कंपन्यांच्या शेअर दरांनी त्यांच्या 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. तर 29 कंपन्यांच्या शेअर दराने त्यांचा 52 आठवड्यांचा नीचांक गाठला. 


इतर महत्त्त्वाच्या बातम्या :