Share Market Closing Bell :  भारतीय शेअर बाजारात गुरुवारी 10 ऑगस्ट रोजी एक्सपायरीच्या दिवशी नफावसुली झाल्याचे दिसून आले. आज बाजारातील व्यवहार थांबले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा (BSE) निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 307 अंकांच्या घसरणीसह 65,688 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (Nifty) 90 अंकांच्या घसरणीसह 19,543 अंकांवर स्थिरावला. 


आज रिझर्व्ह बँकेने (RBI) पतधोरण जाहीर केले. यावेळी आरबीआयने रेपो दरात कोणताही बदल केला नाही.  RBI ने बँकांसाठी अतिरिक्त रोख राखीव प्रमाण ठेवण्याची तरतूद केली आहे. त्याचा परिणाम शेअर बाजारातील व्यवहारावर दिसून आला. 


आरबीआयने पतधोरण जाहीर केल्यानंतर बँक निफ्टी निर्देशांक 339 अंकांच्या घसरणीसह 44,541 अंकांवर बंद झाला. याशिवाय ऑटो, आयटी, फार्मा, एफएमसीजी, इन्फ्रा, हेल्थकेअर, कंझ्युमर ड्युरेबल्स या सेक्टरचे शेअर्सही घसरले. तर केवळ मीडिया, एनर्जी, मेटल्स आणि ऑईल अॅण्ड गॅस क्षेत्रातील शेअर्स तेजीसह बंद झाले. आजच्या व्यवहारात मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्सही घसरले. सेन्सेक्स निर्देशांकातील 30 शेअर्सपैकी 11 कंपन्यांचे शेअर्स तेजीसह बंद झाले. तर निफ्टी निर्देशांकातील 50 कंपन्यांपैकी 19 शेअर्स दर वधारले.  


गुंतवणूकदारांच्या संपत्तीत घट


आज दिवसभरातील व्यवहारात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत घट झाली आहे. मुंबई शेअर बाजारावर (BSE) सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल (Market Cap) 305.54 लाख कोटी रुपयांवर आले आहे.  मागील सत्रात 306.29 लाख कोटी रुपयांवर बंद झाले होते. म्हणजेच आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 75,000 कोटी रुपयांची घट झाली आहे. 


आज कोणत्या शेअर्समध्ये चढ-उतार


आज दिवसभरातील व्यवहारात इंडसइंड बँक 1.59 टक्के, जेएसडब्लू स्टील 0.88 टक्के, टायटन कंपनी 0.83 टक्के, पॉवरग्रीडच्या शेअर दरात 0.73 टक्के, महिंद्रा अॅण्ड महिंद्राच्या शेअर दरात 0.70 टक्क्यांच्या तेजीसह बंद झाले. एशियन पेंट्सच्या शेअर दरात 2.89 टक्के, कोटक महिंद्राच्या शेअर दरात 1.63 टक्के, आयटीसीच्या शेअर दरात 1.56 टक्के, भारती एअरटेलमध्ये 1.08 टक्क्यांची घसरण दिसून आली. 


1917 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण


आज मुंबई शेअर बाजारावर सूचीबद्ध असलेल्या 3741 कंपन्यांच्या शेअर दरात व्यवहार झाले. त्यापैकी बहुतांशी शेअर्सच्या दरात घसरण झाली. आजच्या व्यवहारात 1680 कंपन्यांचे शेअर्स वधारले. तर, 1917 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण झाली. 144 शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही. तर, 248 कंपन्यांच्या शेअर दराने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. तर,  28 कंपन्यांच्या शेअर दराने 52 आठवड्यांचा नीचांक गाठला. 11 कंपन्यांच्या शेअर दराला अप्पर सर्किट लागले. तर, आठ कंपन्यांच्या शेअर दराने लोअर सर्किट गाठले.