नवी दिल्ली : भारतातील शेअर बाजाराची नियामक संस्था सेबीनं डिजीटल गोल्डमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना इशारा दिला आहे. सेबीनं म्हटलं की काही ऑनलाईन प्लॅटफॉर्मस अशा प्रकारची उत्पादनं विकत आहेत जे सेबीच्या नियामक कक्षेत येत नाहीत. त्याचाच अर्थ यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुतंवणूकदारांना कोणत्याही प्रकारचं संरक्षण किंवा गुंतवणुकीला संरक्षण मिळालं नाही. 

Continues below advertisement


SEBI Warning on Digital Gold : डिजीटल गोल्ड धोकादायक, सेबीचा इशारा


सेबीनं या संदर्भात एक प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. त्यानुसार काही डिजीटल किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मस डिजीटल गोल्ड किंवा ई- गोल्ड च्या रुपात गुंतवणुकीची संधी देत आहेत. मात्र, ही उत्पादनं सिक्युरिटीज किंवा कमोडिटी डेरिवेटिव्ज नाहीत. त्यामुळं त्याच्यावर सेबीचं नियंत्रण नाही. अशी उत्पादनं गुंतवणूकदारांना जोखमीत टाकू शकतात, असं म्हटलं. 


काही कंपन्यांकडून डिजीटल गोल्डची विक्री


सध्या काही नामांकित कंपन्यांकडून डिजीटल गोल्डची विक्री केली जाते. त्यामध्ये तनिष्क, एमएमटीसी पीएएमपी, आदित्य बिर्ला कॅपिटल, Caratlane, JoS Alukkas, फोन पे, श्रीराम फायनान्स डिजीटल गोल्डची विक्री करत आहे. उदा. तनिष्कच्या वेबसाईटनुसार ग्राहक 100 रुपयांपासून गुंतवणूक करता येऊ शकते ती केव्हाही काढून घेता येऊ शकते. याशिवाय MMTC PAMP डिजीटल गोल्ड मधील लीडर समजते. 


गुंतवणूकदारांना सुरक्षा मिळणार नाही


सेबीच्या मते हे ब्रँडस विश्वासार्ह असले तरी जर एखाद्याकडून गुंतवलेली रक्कम थकवली गेल्यास त्यावेळेस गुंतवणूकदारांना कोणतीही सुरक्षा मिळणार नाही. कारण ही नियामकाच्या अतंर्गत  येणारी गुंतवणूक नाही. गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंडस (ETFs), इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीटस (EGRs), एक्सचेंज ट्रेडेड कमोडिटी कॉन्ट्रॅक्टस हे सर्व सेबीच्या कक्षेत येतात. सेबीकडे नोंदणी असलेल्या मध्यस्थ म्हणजेच ब्रोकर्स मार्फत खरेदी करता येऊ शकतात. 


सेबीच्या या इशाऱ्यानंतर डिजीटल गोल्डमधील वाढत्या गुंतवणुकीच्या ट्रेंडवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. एकीकडे हा प्लॅटफॉर्म कमी रकमेवर गुंतवणुकीची संधी लोकांना देत असला तरी यामधील आर्थिक जोखीम मात्र वाढली आहे.