मुंबई : एखाद्या कंपनीला शेअर बाजारात म्हणजेच बीएसई आणि एनएसईवर लिस्ट व्हायचं असल्यास किंवा भांडवली बाजारातून पैशांची उभारणी करायची असल्यास आयपीओचा पर्याय निवडला जातो. भारतीय शेअर बाजारात मेनबोर्ड आयपीओ आणि एसएमई आयपीओ  अशा दोन प्रकाराच्या आयपीओचे लॉट गुंतवणूकदारांना खरेदी करता येतात. गेल्या काही दिवसांमध्ये स्मॉल अँड मिडीयम एंटरप्रायझेस च्या आयपीओच्या लॉट खरेदीसाठी गुंतवणूकदारांनी प्रचंड प्रमाणात पैसे लावल्याचं समोर आलं होतं. एसएमई आयपीओतून गुंतवणूकदारांना चांगला परतावा देखील मिळाला होता. आता सेबीनं एसएमई आयपीओ संदर्भातील नियम कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. 


प्रामुख्यानं ज्या कंपनीला एसएमई आयपीओ आणायचा आहे त्या कंपनीला गेल्या तीन वर्षांपैकी दोन वर्षांमध्ये किमान 1 कोटी रुपयांचा नफा झालेला असणं आवश्यक आहे. एसएमई आयपीओत ऑफर फॉर सेल 20 टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही. मिनिमम प्रमोटर काँट्रिब्यूशनंचा लॉक इन कालावधी 1 वर्ष असेल. प्रमोटर्सकडे एमपीसीच्या होल्डिंगपैकी 50 टक्के होल्डिंग एका वर्षात रिलीज करता येऊ शकतं. दुसऱ्या वर्षानंतर 50 टक्के  होल्डिंग रिलीज करता येईल.   



सेबीनं बुधवारी झालेल्या बैठकीत 19 मोठे निर्णय घेतले. ज्यामध्ये एसएमई आयपीओ, आरईआयटी, आयएनवीआयटी आणि यूपीएसआयच्या लिस्टींगसाठीचे नियम कडक केले आहेत.  सेबीनं पास्ट रिस्क अँड रिटर्न वेरिफिकेशन एजन्सीच्या स्थापनेला देखील मंजुरी दिली.


एसएमई आयपीओद्वारे गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाल्याचं पाहायला मिळतं.  पर्पल युनायटेड सेल्स या एसएमई आयपीओनं गुंतवणूकदारांना लिस्टिंगवेळी 57 टक्के परतावा मिळाला. जंगल कॅम्प्स, टॉस द कॉइन, धनलक्ष्मी क्रॉप सायन्स, एमराल्ड टायर मॅन्युफॅक्चर्स, ग्रीन इन्फ्रावर्ल्ड या कंपन्यांच्या आयपीओनं गुंतवणूकदारांना 90 टक्के परतावा मिळाला.   


दरम्यान, भारतीय शेअर बाजारात सध्या न्यू मलायम स्टील, आयडेंटिकल ब्रेन्स स्टुडिओज, एनएसीडीएसी इन्फ्रास्ट्रक्चर हे एसएमई आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले आहेत. तर, मेन बोर्ड आयपीओमध्ये ट्रान्सरेल लायटिंग, ममता मशिनरी, दाम कॅपिटल, सनातन टेक्स्टाइल, कॉनकॉर्ड इनवायरो सिस्टीम्स, वेंटीव हॉस्पिटलिटी, सेनोरेस  फार्मा, कॅरारो इंडिया या कंपन्यांचे मेनबोर्ड आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले आहेत. 


इतर बातम्या : 



(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)