मुंबई : जर तुम्ही देशातील सर्वात मोठी सरकार बँक अर्थात स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) ग्राहक असाल आणि तुम्ही बँकेतून कर्ज घेतलं असेल तर तुमच्याकडून एकही ईएमआय (EMI) चुकणार नाही याची काळजी घ्या. तुमचा एखादा जरी हफ्ता चुकला तर त्याची आठवण करुन देण्यासाठी बँकेने खास मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. एसबीआयची ही मोहीम अशा ग्राहकांसाठी आहे, ज्यांच्याबाबत बँकेला ईएमआय चुकण्याची शंका आहे. वेळेवर कर्जाचे हफ्ते भरावेत यासाठी बँकेने नवीन मोहीम आणली आहे. ही मोहीम काय याची उत्सुकता नक्कीच वाढली असेल, तर याबाबत जाणून घेऊया..  


ग्राहकांना अशी मिळतील चॉकलेट!


भारतीय स्टेट बँकेची ही मोहीम अनोखी आणि खास आहे. जर बँकेला वाटलं की एखादा ग्राहक वेळेवर ईएमआय भरणार नाही तर बँक त्याच्या घरी चॉकलेट पाठवले. बँकेने याबाबत सांगितलं की,  जो ग्राहक ईएमआय भरण्याचं टाळत असेल तो बँकच्या रिमांईडर कॉलचं उत्तर देत नाही. यावरुन संबंधित ग्राहक ईएमआय भरायला टाळाटाळ करत असल्याचं समजतं. अशा परिस्थितीत बँक आता थेट त्याच्या घरी चॉकलेट पाठवून पेमेंट करण्याची आठवण करुन देईल.


रीपेमेंटमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न


एकीकडे बँकिंग क्षेत्रात रिटेल लोनमध्ये तेजी आली असतानाच एसबीआयने ही मोहीम आणली आहे. रिटेल लोनमध्ये मोठी वाढ झाली आहे. परंतु या वाढीसह मासिक हफ्ता चुकवल्याच्या प्रकरणातही वाढ झाली आहे. अशात सर्व बँका ईएमआय आणि रिपेमेंटसाठी वेगवेगळे उपक्रम सुरु करत आहे. त्यातच एसबीआयची ही चॉकलेट योजना देखील वसुली सुनिश्चित करण्याचा प्रयत्न आहे.


बँकेच्या रिटेल लोनमध्ये किती वाढ?


एसबीआयच्या बाबतीत, जून 2023 च्या तिमाहीत रिटेल लोन अर्थात किरकोळ कर्ज 12,04,279 कोटी रुपयांपर्यंत वाढली आहेत. वर्षभरापूर्वी म्हणजेच जून 2022 च्या तिमाहीत ते 10,34,111 कोटी रुपये होतं. त्यामुळे एका वर्षात बँकेच्या किरकोळ कर्जात 16.46 टक्के वाढ झाली आहे. जून 2023 मध्ये SBI चे एकूण कर्ज 33,03,731 कोटी रुपये होते. अशाप्रकारे आता बँकेच्या लोन बुकमध्ये किरकोळ कर्जाचा वाटा सर्वात जास्त आहे.


बँकेची मोहीम प्रायोगिक टप्प्यात


एसबीआयचे व्यवस्थापकीय संचालक अश्विनी कुमार तिवारी यांनी सांगितलं की, "बँकेची ही मोहीम अद्याप प्रायोगिक टप्प्यात आहे. एसबीआयने ही योजना 10 ते 15 दिवसांपूर्वीच सुरु केली आहे. सुरुवातीला चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि या मोहिमेमुळे संकलनात सुधारणा होत आहे. प्रायोगिक टप्प्यात चांगले परिणाम मिळाल्यास त्याचा मोठ्या प्रमाणावर अवलंब करता येईल."


हेही वाचा


Affordable Housing Sales Falls : दोन वर्षांत EMI 20 टक्क्यांनी महागला; परवडणाऱ्या घरांच्या विक्रीत घट