Repo Rate Hike : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) रेपो दरात वाढ केल्यानंतर देशातील अनेक बँकांनीही आपली कर्ज महाग केली आहेत. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) नंही कर्ज महाग केलं आहे. याशिवाय इतर अनेक बँकांनीही आपली कर्ज महाग केली आहेत. महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं शुक्रवारी रेपो दरात 0.50 टक्क्यांनी वाढ केली होती. त्यानंतर बँकांनीही कर्जावरील व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. 


आजपासून नवे दर लागू 


SBI च्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, रेपो रेटशी संबंधित एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट (EBLR) आणि लेंडिंग रेट RLLR मध्ये 50 बेस पॉइंट्सनं वाढ करण्यात आली आहे. या वाढीनंतर, EBLR 8.55 टक्के झाला आहे आणि RLLR 8.15 वर पोहोचला आहे. नवीन दर शनिवारपासून म्हणजेच, आजपासून लागू होणार आहेत. 


तुमचा EMI वाढणार


बँक ऑफ इंडियानं RBLR 8.75 टक्के वाढवला आहे. त्यासोबतच ICICI बँकेनं देखील आपला EBLR वाढवला आहे आणि तो 9.60 टक्के इतका झाला आहे. EBLR हा व्याजदर आहे, ज्याच्या खाली बँका कर्ज देण्यास परवानगी देत ​​नाहीत. कर्जाचा दर वाढल्यानं ज्यांनी EBLR किंवा RLLR वर कर्ज घेतलं आहे त्यांचा EMI वाढणार आहे


HDFC बँकेनं गृहकर्जाच्या व्याजदरात 0.50 टक्क्यांनी वाढ केली आहे. नवे दर 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत. या बँकेनं गेल्या पाच महिन्यांत सातव्यांदा व्याजदरात वाढ केली आहे.


रेपो दर वाढता वाढता वाढे 


महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं यावर्षी मे महिन्यापासून रेपो दरात चार वेळा वाढ केली आहे. रिझव्‍‌र्ह बँकेनं शुक्रवारी चौथ्यांदा रेपो दरात 50 बेसिस पॉइंट्सनं वाढ केल्याची घोषणा केली आहे. आरबीआयनं केलेल्या या वाढीनंतर रेपो दर 5.90 टक्क्यांवर पोहोचला आहे. अनेकांना प्रश्न पडला आहे की, रेपो दर म्हणजे काय?  RBI बँकांना ज्या दरानं कर्ज देते तो दर म्हणजे रेपो दर. त्यामुळं रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात वाढ केल्यानं बँकाही व्याजदरांत वाढ करतात. 


महागाई दर


देशातील किरकोळ महागाई दर सलग आठव्या महिन्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) निर्धारित केलेल्या लक्ष्य मर्यादेपेक्षा जास्त राहिला आहे. गेल्या महिन्यात जाहीर झालेल्या किरकोळ महागाईच्या आकडेवारीवर नजर टाकली तर ऑगस्टमध्ये ती पुन्हा एकदा 7 टक्क्यांवर पोहोचली होती. यापुर्वी जुलै महिन्यात किरकोळ महागाई दरात घट झाली होती आणि ती 6.71 टक्क्यांवर आली होती.