S&P Rating Update नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेसंदर्भात एक चांगली बातमी समोर आली आहे. जागतिक रेटिंग एजन्सी एस अँड पीनं भारताच्या अर्थव्यवस्थेचं रेटिंग अपग्रेड केलं आहे. एजन्सीनं भारताचं रेटिंग 'BBB-' नं वरुन 'BBB' केलं आहे, याशिवाय आऊटलुक स्टेबल म्हणजे स्थिर केलं आहे. एस अँड पी नं भारत फिस्कल प्रूडेंट असून तूट नियंत्रणात असल्याचं म्हटलं. याशिवाय सरकारचा पायाभूत सोयी सुविधांच्या विकासावर फोकस कायम असल्याचं म्हटलं.
एस अँड पीच्या मते पुढील 2 ते 3 वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ वेगानं होण्याची आशा आहे. आरबीआयच्या पतधोरणामुळं महागाई नियंत्रणात आहे. यापुढील काळात देखील महागाई नियंत्रणात राहील अशी अपेक्षा आहे. अमेरिकेनं भारतावर 50 टक्के टॅरिफ लादलं आहे. टॅरिफचा होणाऱ्या परिणामाचा सामना करण्यास भारत सक्षम आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेचा विकास देंशातर्गत कंझम्पशनवर अवलंबून आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेच्या विकासात डोमेस्टिक कंझम्पशनचा वाटा 60 टक्के आहे.
जून महिन्यात एस अँड पीनं भारतीय अर्थव्यवस्थेसाठी वाढीचा अंदाज जारी केला होता. त्यानुसार चालू आर्थिक वर्षात जीडीपी विकास दर 6.5 टक्के राहील असा अंदाज आहे. मान्सून, क्रूडच्या किमतीमध्ये झालेली घसरण, इन्कम टॅक्स मध्ये देण्यात आलेली सूट, महागाई नियंत्रणात असणं आणि आरबीआयच्या पतधोरण विषयक धोरणाचा आधार असल्यानं आणि देशांतर्गत मागणी असल्यानं याशिवाय निर्यातीवरील अवलंबित्व कमी असल्यानं आणि आर्थिक मंदी नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल. याशिवाय देशांतर्गत मागणी जास्त असल्यानं आर्थिक विकासाला चालना मिळेल.
भारतात जुलै मध्ये किरकोळ महागाई आठ वर्षांच्या निचांकी पातळीवर आहे. ही घसरण प्रामुख्यानं खाद्य पदार्थ, भाज्या आणि डाळींच्या किमती कमी झाल्यानं महागाई कमी झाली आहे. CRISIL च्या रिपोर्टमधील अंदाजानुसार आर्थिक वर्ष 2025- 2026 महागाई 3.5 टक्के दर राहील, गेल्या वर्षीच्या 4.6 टक्क्यांपेक्षा कमी आहे.
टॅरिफचा थोडासा प्रभाव जाणवणार
अमेरिकेकडून लादलं जाणारं टॅरिफ सध्या अनेक देशांसमोरील आव्हान आहे. PHDCCI च्या अंदाजानुसार अमेरिकेच्या टॅरिफचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर 0.19 टक्के परिणाम होऊ शकतो, त्यावर सहजपणे मार्ग काढला जाऊ शकतो. टॅरिफमुळं भारताच्या 8.1 अब्ज डॉलर्सच्या निर्यातीवर परिणाम होईल. अमेरिकेच्या टॅरिफमुळं भारताचा जागतिक व्यापार निर्यात 1.87 टक्के प्रभावित होईल.