नवी दिल्ली : 1 ऑगस्टपासून वित्तीय आणि गैर वित्तीय सेवांसंदर्भातील काही नियम बदलले जाणार आहेत. यामुळं नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ शकतो. 1 ऑगस्टला गॅसच्या दरांमध्ये बदल जाहीर होऊ शकतात. यूपीआय व्यवहारांसंदर्भातील नवे नियम लागू होणार आहेत. क्रेडिट कार्डवर मिळणारं विमा संरक्षण बंद होणार आहे.
UPI चे नियम बदलणार
1 ऑगस्टपासून यूपीआय संदर्भातील नवे नियम एनपीसीआयनं लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. गुगल पे,फोन पे, पेटीएम यूजर्स एका दिवसात 25 वेळा बॅलन्स चेक करु शकतात. ट्रांझॅक्शन हिस्ट्री देखील 25 वेळा पाहता येईल. ऑटो पे सकाळी 10 वाजण्याअगोदर, त्यानंतर दुपारी 1 ते 5 आणि रात्री साडे नऊ नंतर होतील. पेमेंट माघारी घेण्याची एक मर्यादा घालण्यात आली आहे. एका महिन्यात 10 वेळा चार्ज बॅक रिक्वेस्ट करता येईल. एका कंपनीकडून 5 वेळा पैसे परत मागता येतील.
गॅस सिलेंडरचे दर घटणार?
तेल आणि गॅस कंपन्या प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला एलपीजी गॅस सिलेंडरचे दर जाहीर करतात. घरगुती आणि व्यावसायिक व्यापराच्या सिलेंडरचे दर जाहीर केले जातात. 1 ऑगस्टपासून दरांमध्ये बदल होऊ शकतात. 1 जुलै रोजी एलपीजी गॅस सिलेंडरचे दर 60 रुपयांनी घटले होते.
सीएनजीचे दर वाढणार की घटणार?
पेट्रोलियम मार्केटिंग कंपन्या प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला विमानात वापरल्या जाणाऱ्या इंधनाचे दर, सीएनजी आणि पीएनजीचे दर देखील जाहीर करतात. 1 ऑगस्ट 2025 ला याच्या दरात बदल होऊ शकतात. सीएनजीचे दर कमी झाल्यास किंवा वाढल्यास त्याचा परिणाम वाहतूक खर्चावर होत असतो.
क्रेडिट कार्डवरील विमा संरक्षण बंद होणार
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्रेडिट कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 11 ऑगस्टपासून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या काही को ब्रँडेड क्रेडिट कार्डसवर मिळणारं अपघात विमा संरक्षण बंद होणार आहे. यामुळं क्रेडिट कार्ड धारकांचं मोठं नुकसान होणार आहे.
आरबीआय रेपो रेट बाबत निर्णय घेणार
आरबीआयच्या पतधोरणविषयक समितीची बैठक 4 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. या बैठकीत आरबीआयचे गव्हर्नर संजय म्हलोत्रा आणि इतर सदस्य व्याज दरात कपात करायची की नाही याचा निर्णय घेतील. याचा थेट परिणाम ईएमआय आणि बचत खात्याच्या व्याजावर होऊ शकतो.
ऑगस्टमध्ये बँका किती दिवस बंद राहणार?
आरबीआय प्रत्येक महिना सुरु होण्यापूर्वी देश आणि राज्यातील सणांच्या पार्श्वभूमीवर बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर करते. आरबीआयच्या माहितीनुसार ऑगस्ट मध्ये 15 दिवस बँका बंद राहतील. यामध्ये स्वातंत्र्य दिन, जन्माष्टमी, गणेश चतुर्थी, रविवार, दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारच्या सुट्ट्यांचा समावेश आहे.
पीएम किसानच्या 20 व्या हप्त्याचे पैसे येणार
पीएम किसान सन्मान निधीच्या 20 व्या हप्त्याचे 2000 रुपये 9 ते 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2 ऑगस्टला येणार आहेत. उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील कार्यक्रमातून याचं वितरण केलं जाणार आहे.