नवी दिल्ली : भारतात लवकरच चलनात प्लास्टिकच्या नोटा पाहायला मिळू शकतात. आरबीआयनं 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिकच्या नोटांची फील्ड ट्रायल करण्याची तयारी सुरु केली आहे. प्लास्टिकच्या चलनासाठी आवश्यक सामग्रीच्या पुरवठ्यासाठी कंपन्यांकडून प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. या प्रकल्पासाठी भारतातील कंपनी UFlex आणि अमेरिकेच्या Spectra सिस्टीमसह मिळून बोली जमा केली आहे.  सरकारनं 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिकच्या नोटांच्या फील्ड ट्रायलला मंजुरी दिलेली आहे. पॉलिमर नोटांचा वापर जगभरातील काही देशांकडून करण्यात येत आहे. कागदी नोटांच्या तुलनेत प्लास्टिकच्या नोटा अधिक टिकाऊ मानल्या जातात. आरबीआयनं प्लास्टिक नोटांचा प्रकल्प काही वर्षांपूर्वी आणला होता. आता पुन्हा एकदा भारतात प्लास्टिकच्या नोटांचा प्रायोगिक तत्वावर पुन्हा प्रयोग सुरु केला जाणार आहे. 

Continues below advertisement

RBI चा प्रकल्प नेमका काय?

भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेडकडून या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली आहे. BRBNMPL ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पूर्ण मालकीची सहायक कंपनी आहे. या प्रकल्पानुसार पॉलिमर किंवा प्लास्टिकच्या नोटांच्या विशेष साहित्याचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांची निवड केली जात आहे. 

या प्रकल्पासाठी BOPP च्या एका विशेष पॉलीप्रोपाइलीन साहित्याची आवश्यकता आहे, ज्यामुळं नोटांची छपाई आणि शाई योग्य प्रकारे चिकटण्यात मदत होईल. प्रस्तावित खरेदीच्या प्रस्तावानुसार 68 हजार रीमची आवश्यकता आहे. 10 आणि 20 रुपयांच्या नोटांसाठी  34,000-34,000 रीमची आवश्यकता आहे.

Continues below advertisement

UFlex आणि Spectra ने लावली बोली

मिळालेल्या माहितीनुसार भारतीय पॉलिमर कंपनी UFlex आणि अमेरिकेच्या Spectra सिस्टीम्सनं भागीदारी केली आहे. दोन्ही कंपन्यांनी एकत्र येत प्लास्टिक नोटांच्या या प्रस्तावासाठी बोली प्रस्ताव जमा केला आहे. या भागीदारीनुसार UFlex ची पॉलिमर बनवण्याची क्षमता आणि Spectra सिस्टीम्सची बँकनोटांची सुरक्षा यासंदर्भातील तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ शकतो. या वृत्तासंदर्भात UFlex ची प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.  

2012 मध्ये प्लास्टिक नोटांचा पायलट प्रोजेक्ट

भारत सरकारनं फेब्रुवारी 2012 मध्ये देशातील 5 शहरांमध्ये पॉलिमर किंवा प्लास्टिकच्या नोटांचा  पायलट प्रोजक्ट राबवला होता. कोची, म्हैसूर, जयपूर, भुवनेश्वर आणि शिमला या शहरात 10 रुपयांच्या प्लास्टिकच्या नोटांची चाचणी करण्यात आली होती. मात्र, त्यावेळी एटीएम आणि मशीनच्या कारणांमुळं अडचणी आल्यानं  तो प्रकल्प थांबवण्यात आला होता.