नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं 2025 या वर्षात रेपो रेटमध्ये मोठ्या प्रमाणात कपात केली आहे. यामुळं गृहकर्जदारांना मोठा दिलासा आहे. रिझर्व्ह बँकेनं 2025 मध्ये 125 बेसिस पॉईंटमध्ये कपात केली आहे. यामुळं गृहकर्जाचे व्याज दर कमी केल्यानं गृहकर्जदारांना 2025 मध्ये मोठ्या प्रमाणात मिळाला. आयआयएफल कॅपिटलच्या रिपोर्टनुसार रिझर्व्ह बँकेला रेपो रेटमध्ये 50 बेसिस पॉईंटनं कपात करण्यासाठी वाव आहे.
आयआयएफएलच्या रिपोर्टनुसार रेपो रेट आणि मुलूभूत सीपीआय महागाई नियंत्रणात असल्यानं आरबीआयला व्याज दर कपातीसाठी वाव आहे. रेपो रेटमधील कपात आणि त्या सोबतच अनियंत्रीकरणामुळं विकासाला चालना मिळेल. बँकांची कर्जाची स्थिती देखील सुधारु शकते.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं डिसेंबरला पतधोरण जाहीर करत असताना 25 बेसिस पॉईंटची कपात केली आहे. त्यामुळं रेपो रेट सद्या 5.25 टक्क्यांवर आला आहे. आरबीआयनं वर्षभरात रेपो रेटमध्ये 125 बेसिस पॉईंटची कपात केली आहे. आरबीआयमध्ये संजय म्हलोत्रा गव्हर्नर म्हणून येण्यापूर्वी रेपो रेट 6.50 टक्के होता. तिथून रेपो रेट 5.25 टक्क्यांवर आला आहे. आता रेपो रेटमध्ये येत्या वर्षभरात 50 बेसिस पॉईंटची कपात होईल, असा अंदाज वर्तवल्यास रेपो रेट 4.75 टक्क्यांवर येईल.
आरबीआयकडून करण्यात आलेली रेपो रेटमधील कपात आणि आर्थिक सुधारणा यामुळं भारताचा जीडीपी 2026 मध्ये वेगानं वाढेल, असा अंदाज आहे. आयआयएफएल कॅपिटलकडून व्याज दरात 50 बेसिस पॉईंट कपातीला वाव असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
रेपो रेटमध्ये कपात केल्यास काय होणार?
रेपो रेटमध्ये आरबीआयनं येत्या काळात म्हणजेच 2026 मध्ये 0.50 टक्क्यांची कपात केल्यास बँकांना कमी व्याज दरानं कर्ज वितरण करावं लागेल. याचा फायदा जुन्या आणि नव्या कर्जदारांना मिळेल. गृह कर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जाचे व्याज दर कमी झाल्यानं ईएमआयची रक्कम कमी होईल. कंपन्यांसाठी कमी व्याज दरात कॉर्पोरेट लोन मिळेल. मात्र, दुसरीकडे मुदत ठेव ठेवणाऱ्या ग्राहकांना कमी व्याज दर मिळेल.
2025-26 मध्ये आरबीआयच्या पतधोरण समितीच्या 6 बैठकांपैकी 5 बैठका पार पडल्या आहेत. आता सहावी बैठक 4 ते 6 फेब्रुवारीला होणार आहे. म्हणजेच केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर होणार आहे.
आरबीआयनं आयआयएफएल कॅपिटलच्या रिपोर्टनुसार व्याज दरात कपात केल्यास अर्थव्यवस्थेच्या वाढीला वेग मिलेल. बँकांची कामगिरी देखील सुधारु शकते. दुसरीकडे कच्चा तेलाच्या किमती 65 डॉलर प्रति बॅरल राहण्याची शक्यता असल्यानं महागाईचं संकट देखील कमी होऊ शकतं.
तज्ज्ञांच्या मते व्याज दर कमी झाल्यानं शेअर बाजारात प्रामुख्यानं बँकिंग आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील शेअरमध्ये तेजी येऊ शकते. निफ्टीमध्ये सध्यापेक्षा 15 टक्के अधिक रिटर्न मिळू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
