RBI News मुंबई: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून वेळोवेळी नियमांचं पालन न करणाऱ्या बँकांवर आणि फायनान्स कंपन्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते. आरबीआयकडून इंडसइंड बँकेसह 4 फायनान्स कंपन्यांना दंड करण्यात आला आहे. इंडसइंड बँकेवर नियमांचं पालन न केल्यानं तब्बल 59.20 लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे.

Continues below advertisement

इंडसइंड बँकेला 59.20 लाखांचा दंड 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं इंडसइंड बँकेला 59.20 लाख रुपयांचा दंड केला आहे. बँकेवर मुदत ठेवीवरील व्याज दर आणि सिक्युरिटायझेशन संदर्भातील आरबीआयच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवला आहे. आरबीआयला इंडसइंड बँकेच्या केलेल्या तपासणीत आढळून आलं की बँकेनं चालू खात्यातील जमा रकमेवर व्याज दिलं. मात्र, अशा प्रकारच्या खात्यांवर व्याज देण्याचे नियम वेगळे आहेत. याशिवाय बँकेनं सिंथेटिक सिक्यूरिटायझेशन सारख्या गोष्टी केल्या ज्या आरबीआयच्या नियमानुसार नव्हत्या.  

इंडसइंड बँकेसह इतर तीन वित्तीय संस्थांवर देखील आरबीआयनं कारवाई केली आहे. फ्यूजन फायनान्सनंम केवायसीच्या नियमाचं पालन न केल्यानं 2.7 लाख रुपयांचा दंड केला आहे.  याशिवाय नॉर्थन एआरसी कॅपिटल या कंपनीला ग्राहकांच्या तक्रारीसंदर्भात योग्य माहिती न देणे आणि इंटरनल ऑम्बसमॅन संदर्भातील नियमांबाबत बेजबाबदारपणामुळं 6.2 लाख रुपयांचा दंड केला आहे. मुथूट एमक्रेडवर व्याज आणि मुद्दल भरल्याशिवाय काही एनपीए खाती स्टँडर्ड श्रेणीत वर्ग केल्यानं 3.1 लाख रुपयांचा दंड केला आहे.  

Continues below advertisement

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं केलेली दंडात्मक कारवाई नियमांचं पालन न केल्यामुळं करण्यात आली आहे. त्या बँकांच्या आणि फायनान्स कंपन्यांच्या ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही. इंडसइंड बँक, नॉर्थन आर्क कॅपिटल आणि फ्यूजन फायनान्सच्या 31 मार्च 2025  रोजीच्या वित्तीय स्थितीच्या आधारे आरबीआयनं दंडात्मक कारवाई केली आहे.