नवी दिल्ली : केंद्र सरकारनं मंगळवारी संसदेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे 880.52 मेट्रिक टन सोन्याचा साठा असल्याची माहिती दिली. मात्र, सरकारनं याचवेळी देशातील धार्मिक ठिकाणांवर आणि कुटुंबाकडे किती सोनं आहे, यासंदर्भातील माहिती नसल्याचं म्हटलं. केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांना एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती राज्यसभेत दिली. 26 जून 2026 च्या आकडेवारीनुसा भारतीय रिजर्व्ह बँकेकडे 880.52 मेट्रिक टन सोनं आहे.
आरबीआयकडील सोन्याच्या साठ्यात वाढ
पंकज चौधरी म्हणाले की 31 मार्च 2025 ला आरबीआयकडे 879.58 मेट्रिकटन सोनं होतं. त्यापूर्वी 31 मार्च 2024 ला 822.10 मेट्रिक टन सोनं आरबीआयकडे होते. आरबीआयकडे सध्या किती सोनं आहे? देशातील धार्मिक स्थळांवर आणि भारतातील कुटुंबाकडे किती सोनं आहे, याचा अभ्यास केला गेला आहे का असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर सरकारकडून राज्यसभेत देण्यात आलं आहे.
सोने आणि चांदीच्या दरात घसरण
कमजोर जागतिक संकेत आणि रुपया मजबूत झाल्यानं नवी दिल्लीतील सर्राफा बाजारात मंगळवारी सोन्याच्या दरात 2640 रुपयांची घसरण झाली, यामुळं एक तोळे सोन्याचा दर 1.47 लाख प्रति तोळा झाला. दुसरीकडे चांदीच्या दरात 5200 रुपयांची घसरण झाली आहे. अखिल भारतीय सर्राफा संघानुसार 24 कॅरेट सोन्याचा दर सोमवारी 1,49,640 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. त्या तुलनेत आज 2,640 रुपयांनी सोन्याचे दर कमी होऊन 1,47,000 रुपयांवर आले. चांदीच्या दरात देखील घसरण पाहायला मिळाली, आज चांदीचे दर 5,200 रुपयांनी कमी होत 2,24,800 रुपये किलोवर आला.
सर्राफा व्यावसायिकांनी रुपया मजबूत झाल्यानं देशांतर्गत बाजारात सोने चांदी आयात करण्याचा खर्च कमी झाल्याचं म्हटलं. दुसीरकडे अमेरिकन फेड रिझर्व्हकडून पतधोरण जाहीर करण्यापूर्वी गुंतवणूकदारांकडून सतर्कता बाळगण्यात आली.एचडीएफसी सिक्यूरिटीजचे रिसर्च विश्लेषक सौमिल गांधी यांनी म्हटलं की सोन्याच्या दरात मंगळवारी घसरण झाली आहे. अमेरिकन फेड रिझर्व्हकडून पतधोरण जाहीर करण्यापू्र्वी गुंतवणूकदार सतर्क झालेत.
जागतिक बाजारात हाजिर सोन्याचा दर 53.50 डॉलरनं घसरुन 4023.50 डॉलर प्रति औंसवर आलं आहे. चांदीचे दर दोन टक्क्यांनी घसरुन 57.24 डॉलर प्रति औंसवर आले आहेत.
दरम्यान, इंडिया बुलियन्स ज्वेलर्स असोसिएशनकडून दिवसातून दोन वेळा सोने आणि चांदीचे दर जाहीर केले जातात. आयबीजेएच्या दरांनुसार 24 कॅरेट सोन्याचा दर 142291 रुपये 10 ग्रॅम आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 130339 रुपये प्रति तोळा झाला आहे. दुसरीडे चांदीच्या दरात देखील मोठी घसरण झाली. एक किलो चांदीचा दर 217349 रुपयांवर पोहोचला आहे.
