मुंबई : शेअर बाजारात तेजी आणि घसरणीचं चित्र पाहायला मिळत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचा स्टॉक पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर झाल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी घसरला आहे. आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या स्टॉकमधील घसरण अद्याप कायम आहे. सोमवारी रिलायन्सच्या स्टॉकमध्ये 3 टक्के घसरण झाली होती. शेअर घसरल्यानं मुकेश अंबानी यांची नेटवर्थ देखील घसरली आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज बाजारमूल्याच्या हिशोबानं देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. रिलायन्सचे शेअर सलग दुसऱ्या दिवशी घसरुन 1415 रुपयांवर आले आहेत. काल रिलायन्सचा शेअर 1428 रुपयांवर बंद झाला होता. आज बाजार सुरु झाला तेव्हा या स्टॉकमध्ये ट्रेडिंग 1427 रुपयांवर सुरु झालं, त्यानंतर घसरण सुरु झाली. रिलायन्सचं बाजारमूल्य घसरुन 19.18 लाख कोटी रुपये इतकं झालं आहे.
शेअर बाजारातील घसरणीप्रमाणं रिलायन्स इंडस्ट्रीजच्या स्टॉकमध्ये घसरण झाल्यानं मुकेश अंबानी यांची नेटवर्थ देखील घटली आहे. गेल्या आठवड्याापूर्वी रिलायन्सचं बाजारमूल्य 19.98 लाख कोटी रुपये होते. तेव्हापासून 68 ते 69 हजार कोटींनी रिलायन्सचं बाजारमूल्य घसरलं आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचं बाजारमूल्य सध्या 19.18 लाख कोटी राहिलं आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये घसरण झाल्यानं आणि मार्केट कॅप घसरल्यानं मुकेश अंबानी यांच्या नेटवर्थ वर देखील परिणाम झाला आहे. मुकेश अंबानी यांचं नेटवर्थ 104 अब्ज डॉलर्सनं वर आलं आहे. ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्स नुसार गेल्या 24 तासात मुकेश अंबानी यांची संपत्ती 28270 कोटी रुपयांनी घटली आहे. मुकेश अंबानी 2025 मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या अब्जाधीशांच्या यादीत आहेत. मुकेश अंबानी यांची नेटवर्थ 12.9 अब्ज डॉलर्सनं वाढली आहे.
मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या स्टॉकमध्ये दीर्घकाळानंतर मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. अलीकडच्या घसरणीच्या कारणांचा विचार केला तर रशियाच्या तेलावर यूरोपियन यूनियनकडून घालण्यात आलेल्या बंदी हे एक कारण असावा असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजकडून EU च्या निर्बंधांच्या प्रभावाचं आकलन करत आहोत असं सांगितलं. वेल्थमिल्स सिक्युरिटीजचे इक्विटी स्ट्रॅटेजी डायरेक्टर क्रांति बाथिनी यांच्या मते रशियन ऑईलवरील बंदीमुळं रिलायन्सच्या अडचणी वाढण्याची भीती व्यक्त केली आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)