Reliance AGM 2022: रिलायन्स इंडस्ट्रीजची वार्षिक सर्वसाधारणसभा (AGM) आज पार पडणार आहे. रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) या बैठकीत मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे. रिलायन्स 5 जी इंटरनेट सेवेचा शुभारंभ (Reliance 5G Internet), 5 जी इंटरनेट दरासह (Reliance Jio 5G Internet Price) जिओच्या आयपीओची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याशिवाय, मुकेश अंबानी कंपनीच्या संचालक मंडळावर आपल्या मुलांना सहभागी करून घेतील अशी शक्यता आहे. रिलायन्सच्या गुंतवणूकदारांसह मुंबई शेअर बाजाराचेही लक्ष या बैठकीकडे लागले आहे. 


5 जी सेवा कधी सुरू होणार?


रिलायन्स जिओने 5 जी स्पेक्ट्रमच्या लीलावात बाजी मारली आहे. रिलायन्स जिओला देशातील सर्वाधिक सर्कलमध्ये 5 जी स्पेक्ट्रम मिळाले आहे. त्यानंतर कंपनीच्या शेअर दरात मोठी उसळण दिसून आली आहे. आज होणाऱ्या सर्वसाधारण बैठकीत मुकेश अंबानी जिओच्या 5 जी बाबत घोषणा करण्याची शक्यता आहे. या 5 जी इंटरनेटचे दरही जाहीर होऊ शकतात. 5 जी इंटरनेट स्वस्त दरात देणार असल्याचे जिओचे आकाश अंबानी यांनी याआधी म्हटले होते.


जिओचा आयपीओ?


रिलायन्स जिओचा आयपीओ येणार असल्याची चर्चा मागील काही महिन्यांपासून सुरू होती. रिटेल क्षेत्रातही मजबूत पकड मिळवण्यासाठी रिलायन्सकडून प्रयत्न सुरू आहेत. या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत रिलायन्स जिओ आणि रिलायन्स रिटेलच्या आयपीओबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. 


ग्रीन एनर्जीवर लक्ष


रिलायन्स ग्रीन एनर्जीवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे अंबानी यांनी मागील वार्षिक सर्वसाधारण बैठकीत जाहीर केले होते. कंपनीने मागील वर्षी सोलर मॉड्युल्स, हायड्रोजन इलेक्ट्रोलायजर्स, फ्यूल सेल्स आणि स्टोरेज बॅटरी तयार करण्यासाठी 4 गीगा-फॅक्टरीज तयार करण्याची घोषणा केली होती. रिलायन्सने जागतिक पातळीवर ग्रीन एनर्जीशी संबंधित काही लहान कंपन्यांना अधिग्रहित केले आहे. 
 
मुकेश अंबानी यांचा वारस कोण?


मुकेश अंबानी हे जून महिन्यातच रिलायन्स जिओच्या चेअरमन पदावरून पायउतार झाले होते. रिलायन्स जिओची धुरा त्यांचे सुपुत्र आकाश अंबानी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. मुकेश अंबानी कंपनीची धुरा स्वत: कडे ठेवणार का याकडे लक्ष लागले आहे.  मुकेश अंबानी हे पत्नी नीता अंबानी, मुलगी ईशा आणि सुपुत्र अनंत यांच्या जबाबदारीतही वाढ करू शकतात, अशीही चर्चा सुरू आहे. ईशा आणि अनंत हे याआधीच रिलायन्स समूहातील अनलिस्टेड कंपनीच्या संचालकपदावर आहेत.