Recession India: जून 2023 नंतर भारतामध्ये आर्थिक मंदी येण्याची शक्यता आहे. पण केंद्र सरकार दुष्परिणाम रोखण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते जी 20 परिषदेचं उद्घाटन झालं. त्यानंतर राणे यांनी पत्राकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जूननंतर भारतात आर्थिक मंदीची शक्यता वर्तवली आहे.
भारत आर्थिक मंदीला सामोरं जाऊ शकतं का? असा प्रश्न विचारल्यानंतर नारायण राणे म्हणाले की, 'भारतात मंदी आली तर जून नंतर येईल. त्याचे दुष्परिणाम रोखण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे.' उद्योग वाढवले तर रोजगार वाढेल. रोजगार वाढला तर जीडीपी वाढेल. आपल्याला प्रॉफिट कमवणाऱ्या टेक्नॉलॉजी हव्यात, असे राणे म्हणाले.
सरकार बदलले म्हणून उद्योग बाहेर जात नाहीत - नारायण राणे
महाराष्ट्राच्या प्रशासनाबद्दल मला अभिमान आहे. सगळे विषय कॅबिनेटमध्ये येतात, आपल्या नेत्यांच्या बुद्धिमत्ता कमी लेखणे चुकीचे आहे. सरकार बदललं म्हणून निर्णय बदलतात असं नाही. एखादा निर्णय पोषक नसेल तर तो बदलला जातो, सरकार बदललं की दृष्टिकोन बदलतो. सरकार बदलले म्हणून उद्योग बाहेर गेले असे होत नाही. आपल्याकडे गुंतवणूक व्हावी म्हणून उद्योग आणले जातात. मी 4 वर्ष उद्योगमंत्री होतो, जे राज्य जास्त सौलत देईल जागेवर, टॅक्सवर तिथे उद्योग येतात. काही लोक जागा कमी देतात, महाराष्ट्रात जमीन महाग, पायाभूत सुविधा यावर जमिनीचे दर जास्त आहेत. महाराष्ट्र विकसित राज्य असल्यानं येथील खर्च जास्त आहेत. काही उद्योग तेवढ्यापुरते जातात आणि महाराष्ट्रात परत येतात, असे नारायण राणे म्हणाले.
पुण्यातील पायाभूत सुविधा पुढील काळात कशा असतील, यासंदर्भात केंद्र सरकारला पत्र दिलं आहे. जीडीपी वाढण्यासाठी महाराष्ट्र विकसित करण्यासाठी केंद्र प्रयत्न करत आहे. पुण्याला औद्योगिक केंद्र समजतो. आदर्श पायाभूत सुविधा चांगली झाली तर पुणेकरांना पण फायदा होईल, असे राणे म्हणाले.
G20 का महत्त्वाची?
G20 मधील कमळ भारताचे, भाजपचे नाही. नरेंद्र मोदी G20 अध्यक्ष आहेत. अमेरिकेचा GDP 20 ट्रिलियन आहे. भारताची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी G20 फायद्याची ठरणार आहे. GDP सुधारण्यासाठी ही आंतरराष्ट्रीय परिषद आहे. यामुळे दारिद्रय कमी होईल, रोजगार वाढेल, सुशिक्षित भारतकडे आपण चाललोय. 80 कोटी लोकांना अन्न पुरवतो. G२० मध्ये निसर्ग महत्त्वाचा मुद्दा आहे, असं राणे म्हणाले.