RBI Increased Gold Purchase : रिझर्व्ह बँक मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करत आहे. रुपयाची घसरण थांबवण्यासाठी सोन्याची खरेदी वाढवण्याचं धोरण RBI ने अवलंबल आहे. मार्च 2025 च्या अखेरीस RBI ने एकूण 50 टन सोने खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तयारी सुरु केली आहे. यामुळं परकीय चलनाचा साठा वाढवणे तसेच चलन किमती बदलण्याचा धोका कमी करणे हा उद्देश आहे. याशिवाय अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची अस्थिरताही कमी करावी लागेल.


ऑक्टोबर महिन्यापासून रिझर्व्ह बँकेने सोन्याच्या खरेदीत वाढ केली आहे. यासह, भारताच्या परकीय चलनाच्या गंगाजळीचा महत्त्वाचा भाग म्हणून सोन्याचा साठ्याकडे बघितलं जात आहे. परकीय चलनाच्या साठ्याचा भाग म्हणून सोन्याचा साठा सप्टेंबरच्या अखेरीस विक्रमी उच्चांक गाठला होता. त्यामुळे अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण रोखणे खूप सोपे झाले आहे.


भारताने सप्टेंबरपर्यंत 32.63 टन सोन्याची खरेदी केली 


रिझर्व्ह बँकेने एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान 32.63 टन सोन्याची खरेदी केली आहे. अशाप्रकारे, मार्चमध्ये भारताचा सोन्याचा साठा 52.67 अब्ज डॉलरवरुन 65.74 अब्ज डॉलर झाला आहे. 


आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या चांदीच्या दरात सातत्यानं वाढ 


दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या चांदीच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ही वाढ सुरुच आहे. त्यामुळं सर्वसामान्य नागरिकांना सोन्याची खरेदी करणं परवड नाही. त्यामुळं मोठ मोठ्या बँका, संस्था, सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. कारण सोन्यातील गुंतवणुक ही मोठ्या फायद्याची समजली जाते. कारण या गुंतवणुकीतून मोठा परतावा मिळत आहे. कारण सोन्याच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळं अनेक बँकांचा आणि संस्थांचा सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यात कल वाढत आहे.


भारतात सोन्याला संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते


भारतात सोन्याला संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. जे देशाच्या संस्कृती आणि परंपरेत महत्त्वाची भूमिका बजावते. सोन्याच्या भावात वाढ होऊनही लोकांची दागिने खरेदीची उत्सुकता कमी झालेली नाही. बरेच लोक याला गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय मानतात. सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढत असले तरी त्याचा लोकांवर काहीही परिणाम होत नाही. लोकांमध्ये दागिने खरेदीची क्रेझ कायम असल्याचं चित्र दिसत आहे. दरम्यान, पुढच्या काळात सोन्या चांदीच्या दरात घसरण होणार का? असा देखील सवाल उपस्थित केला जातोय? मात्र, पुढच्या काळात देखील सोन्या चांदीच्या दरात वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.