Ram Mandir : राम मंदिर (Ram mandir) उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात सध्या उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणाहून भाविक अयोध्येत (Ayodhya) दाखल होण्यास सुरुवात होणार आहे. 22 जानेवारीला हा सोहळा संपन्न होणार आहे. राममंदिराच्या उभारणीच्या सुरुवातीपासूनच अयोध्येत अनेक कायापालट होत आहेत. उत्तर प्रदेश सरकारने अयोध्येला जागतिक दर्जाचे शहर बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी व्हिजन-2031 आणि व्हिजन-2051 सादर करण्यात आले आहेत. त्यामुळं पुढील काही वर्षांत अयोध्येत सुमारे 1.3 लाख नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. 


राम मंदिराच्या उभारणीमुळे अयोध्या शहराची स्थिती पूर्णपणे बदलत चालली आहे. राम मंदिरामुळं अयोध्येत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक वाढली आहे. यामुळं शहरात पुढच्या काळात 1.3 लाख रोजगार निर्माण होणार आहेत. या नोकऱ्या 20 विविध सेक्टरमध्ये निर्माण होणार आहे. पाहुयात याच संदर्भातील सविस्तर माहिती. 
उत्तर प्रदेश सरकार अयोध्येत सध्या वेगवेगळ्या प्रकल्पांवर काम करत आहे. यात केवळ शहराचे सुशोभीकरण किंवा रस्ते रुंदीकरणाचा समावेश नाही. त्याऐवजी, सरकार पर्यटनापासून नवीन ग्रीनफिल्ड टाऊनशिप उभारण्यापर्यंत आणि थीम पार्क बनवण्यापर्यंत सर्व गोष्टींवर काम करत आहे.


'या' 20 क्षेत्रात होणार मोठी गुंतवणूक 


अयोध्येत 20 क्षेत्रात होणार मोठी गुंतवणूक होणार आहे. याबाबतची योजना सरकारनं राबवली आहे. अलीकडेच, उत्तर प्रदेश ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटमध्ये, उत्तर प्रदेश सरकारने अवधपुरीसाठी सुमारे 1.54 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणूक प्रस्तावांवर स्वाक्षरी केली आहे. त्यानुसार मत्स्यव्यवसाय, शहरी विकास, पर्यटन, गृहनिर्माण, ऊर्जा, वैद्यकीय शिक्षण, कृषी, उच्च शिक्षण, UPSIDA, आरोग्य, वन क्षेत्र, MSME, GIDA, फलोत्पादन, तांत्रिक शिक्षण, दुग्धविकास, आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स, आयुष, अन्न पुरवठा आणि सहकारी संस्था इत्यादी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणार आहे. 


कोणत्या क्षेत्रात किती नोकऱ्या निर्माण होणार?


उत्तर प्रदेश सरकारनं दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य शिक्षण क्षेत्रात सर्वाधिक 25417 नोकऱ्या निर्माण होणार आहेत. याशिवाय पर्यटन क्षेत्रात 24,712 नोकऱ्या, ऊर्जा क्षेत्रात 14,135 नोकऱ्या, मत्स्यव्यवसायात 10,030 नोकऱ्या निर्माण होणार आहेत. तर 7235 लोकांना शहरी विकासात, 6038 लोकांना गृहनिर्माण, 6375 लोकांना आरोग्य सेवेत आणि 5412 लोकांना एमएसएमई क्षेत्रात रोजगार मिळणार आहे.


अयोध्येतील 1400 एकरावर नवीन टाऊनशिपचे काम सुरु


सध्या अयोध्येत 1400 एकरांची नवीन टाऊनशिप उभारली जात आहे. हे लखनौ-गोरखपूर महामार्गाच्या दोन्ही बाजूला असरणार आहे. यामध्ये मठ आणि आश्रमासाठी 28 भूखंड ठेवण्यात आले आहेत. तर 12 भूखंड हॉटेल्ससाठी आहेत. त्याचबरोबर सरयूच्या काठावर थीम पार्क बांधणे, 14 कोसी परिक्रमा मार्ग बांधणे, रिंगरोड तयार करणे आदी कामेही सुरू आहेत. अयोध्येबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शहराचा विकासासंदर्भात सूचना केल्या आहेत. अयोध्येला भेट देण्यासाठी आलेले लोक एक-दोन दिवस इथेच राहीले पाहिजेत. या संदर्भातही समाजातील प्रत्येक घटकाच्या गरजा लक्षात घेऊन अयोध्येत धर्मशाळा, होम स्टे आणि हॉटेल इत्यादी विकसित केल्या जात आहेत.


महत्त्वाच्या बातम्या:


राम मंदिराला मिळालं जगातील सर्वात महागडं रामायण, नेमकी किंमत किती? या रामायणात खास काय?