मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या मुंबई मंडळाकडून 2030 घरांसाठी लॉटरी काढण्यात आली आहे. या लॉटरी प्रक्रियेतील अंतिम यादी म्हाडाकडून जाहीर करण्यात आली आहे. म्हाडाकडून 8 ऑक्टोबरला सोडत काढली जाणार आहे. म्हाडाची लॉटरी जाहीर होण्यापूर्वीच सहा घरांचे विजेते ठरले आहेत. घरांच्या संख्येपेक्षा अधिक अर्ज न आल्यानं सहा जणांचा घरं मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांचा समावेश आहे. लोकप्रतिनिधी कोट्यातून त्यांनी अर्ज दाखल केला होता. राजू शेट्टी आता मुंबईकर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
शिवार ते मुंबई असा राजू शेट्टी यांचा प्रवास या निमित्तानं पूर्ण होणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतमाल आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्या राजू शेट्टी यांनी म्हाडाच्या लॉटरीमध्ये अर्ज दाखल केला होता. लोकप्रतिनिधी कोट्यातून त्यांनी अर्ज केला होता, या कोट्यात एकूण 3 घरं उपलब्ध होती, त्यामध्ये केवळ एक अर्ज आल्यानं राजू शेट्टी यांचा मुंबईकर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राजू शेट्टी यांना पवईतील कोपरी पवई येथील घरं लागलं आहे. लोकप्रतिनिधी गटातून त्यांचा एकमेव अर्ज आल्यानं लॉटरी जाहीर होण्यापूर्वीच ते विजेते ठरले आहेत. राजू शेट्टी यांनी ज्या घरासाठी अर्ज केला होता त्याची किंमत 1 कोटी 20 लाख 13 हजार 323 रुपये इतकी आहे. त्यामुळं म्हाडाची सोडत जाहीर होण्यापूर्वीच त्यांचं मुंबईतील घराचं स्वप्न पूर्ण होणार असल्याचं स्पष्ट झालंय.
म्हाडाची सोडत 8 ऑक्टोबरला
म्हाडाकडून 2030 घरांच्या सोडतीची लॉटरी काढण्यासाठी 8 ऑक्टोबर ही तारीख निश्चित केलेली आहे. म्हाडानं अर्ज सादर करण्यास मुदतवाढ दिल्यानं मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले. 1 लाख 13 हजार अर्जदारांनी अर्जासोबत अनामत रक्कम भरली होती. त्या अर्जदारांना घर मिळणार की नाही याचा निर्णय 8 ऑक्टोबरला होणार आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर इथं हा कार्यक्रम होणार आहे. ज्या अर्जदारांना घरं लागणार नाही त्यांची अनामत रक्कम 9 ऑक्टोबरपासून परत करण्यास सुरुवात होईल.
अल्प आणि अत्यल्प गटातील घरांसाठी सर्वाधिक अर्ज
म्हाडाच्या लॉटरीला अल्प आणि अत्यल्प गटातील अर्जदारांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे. मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील घरांसाठी तुलनेने अर्ज कमी आले आहेत.
दरम्यान, म्हाडाकडून पुढील काळात कोकण मंडळाकडून जवळपास 8 हजार घरांसाठी लॉटरी काढली जाणार आहे.
इतर बातम्या :