PM Kisan Samman Nidhi Yojana : केंद्र सरकारकडून आज शेतकऱ्यांना मोठी भेट मिळणार आहे. केंद्र सरकारतर्फे राबवल्या जाणाऱ्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 15 हप्त्याची वाट पाहणाऱ्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी  (PM Narendra Modi) आज 15 नोव्हेंबर 2023 रोजी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 15 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. आज पंतप्रधान मोदी 18,000 कोटी रुपयांचा निधी जारी करतील, यामुळे 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.


केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना मोठी भेट


पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) योजनेंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी 6,000 रुपये देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करते. दर 4 महिन्यांनी शेतकर्‍यांच्या खात्यावर 2,000 रुपये जमा केले जातात. केंद्र सरकारने 27 जुलै 2023 रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 14 वा हप्ता जारी केला होता. या योजनेंतर्गत आतापर्यंत 14 हप्त्यांमध्ये 2.62 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करण्यात आले आहेत. त्यानंतर आता चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात पंधरावा हफ्ता जमा होणार आहे. 


... तर मिळणार नाही लाभ


केंद्र सरकार आज पीएम किसान योजनेचा 15 वा हप्ता जारी करणार आहे. किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी (eKYC) करणं अनिवार्य आहे. जर तुम्ही ई-केवायसी (PM Kisan eKYC) केलं नसेल, तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे जर तुम्ही ई-केवायसी केलं नसेल तर लगेच करुन घ्या.


तुम्हांला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार की नाही, लाभार्थी यादी कशी तपासाल. जाणून घ्या.



  • सर्वात आधी PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जा.

  • येथे तुम्हाला उजव्या बाजूला फार्मर्स कॉर्नरचा पर्याय मिळेल.

  • येथे Beneficiary Status या पर्यायावर क्लिक करा. एक नवीन पेज उघडेल.

  • नवीन पेजवर आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यांपैकी एक पर्याय निवडा. 

  • या तीन क्रमांकांद्वारे तुम्ही तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही हे तपासू शकता.

  • तुम्ही निवडलेल्या पर्यायाचा नंबर प्रविष्ट करा. यानंतर Get Data वर क्लिक करा.

  • येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व व्यवहारांची माहिती मिळेल.

  • जर तुम्हाला FTO जनरेट झाले आहे आणि पेमेंट कन्फर्मेशन पेंडिंग लिहिलेले दिसत असेल तर याचा अर्थ तुमच्या रकमेवर प्रक्रिया होत आहे.