PM Internship Scheme News: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024 च्या अर्थसंकल्पात कौशल्य विकास आणि तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पीएम इंटर्नशिप योजना (PM Internship Scheme) सुरु केल्याची घो,णा केली होती. या 800 कोटी रुपयांच्या पीएम इंटर्नशिप योजनेला कंपन्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पीएम इंटर्नशिप योजनेंतर्गत आतापर्यंत 90,849 रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. या योजनेचे उद्दिष्ट 1.25 लाख तरुणांना मोठ्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करुन देणे हे आहे. ही योजना 21 ते 24 वयोगटातील तरुणांसाठी आणली आहे.


इंटर्नशिप योजनेत 24 क्षेत्रातील कंपन्यांचा सहभाग 


कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, इंटर्नशिप पोर्टल 3 ऑक्टोबर रोजी सुरु झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 193 कंपन्यांनी तरुणांसाठी इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. या पोर्टलवर मारुती सुझुकी इंडिया, आयशर मोटर, एल अँड टी (लार्सन अँड टुब्रो), रिलायन्स इंडस्ट्रीज, मुथूट फायनान्स आणि जुबिलंट फूडवर्क्स यासारख्या मोठ्या कंपन्या संधी उपलब्ध करून देत आहेत. सुमारे 24 क्षेत्रातील कंपन्यांनी इंटर्नशिप योजनेत सहभाग घेतला आहे. यामध्ये तेल, वायू, ऊर्जा, प्रवास, आदरातिथ्य, ऑटोमोबाईल, बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश आहे.


737 जिल्ह्यांमध्ये नोकऱ्या उपलब्ध होणार


पीएम इंटर्नशिप योजनेअंतर्गत तरुणांना ऑपरेशन्स, मॅनेजमेंट, प्रोडक्शन, मॅन्युफॅक्चरिंग, मेंटेनन्स, सेल्स आणि मार्केटिंग यांसारख्या सुमारे 20 क्षेत्रात रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे. या नोकरीच्या संधी देशातील 737 जिल्ह्यांमध्ये दिल्या जाणार आहेत. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने या योजनेद्वारे एक कोटी तरुणांमध्ये कौशल्य विकसित करण्याची योजना आखली आहे. तरुणांना देशातील मोठ्या कंपन्यांमध्ये एक वर्ष काम करण्याची संधी मिळेल, जिथे ते खऱ्या व्यावसायिक दबावाला तोंड द्यायला शिकतील.


इंटर्नशिप योजनेत सामील होण्यासाठी पात्रता काय?


या योजनेचा भाग होण्यासाठी, तुम्ही 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पॉलिटेक्निक डिप्लोमा किंवा पदवीधर पदवीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तसेच, नोकरी करणारे किंवा नियमित पदवी घेणारे लोक याचा भाग होऊ शकणार नाहीत. तरुणांना इंटर्नशिप पोर्टलद्वारे अर्ज करावा लागेल. या योजनेचा भाग असलेल्यांनाही सरकार पीएम जीवन ज्योती विमा आणि पीएम सुरक्षा योजना (सुरखा योजना) अंतर्गत कव्हर करेल.


5 वर्षांत देशातील सुमारे 1 कोटी तरुणांना कंपन्यांमध्ये इंटर्नशिप दिली जाणार 


पीएम इंटर्नशिप योजनेअंतर्गत 5 वर्षांत देशातील सुमारे 1 कोटी तरुणांना कंपन्यांमध्ये इंटर्नशिप दिली जाणार आहे. या योजनेत इंटर्नला दरमहा 5,000 रुपये दिले जातील. त्यापैकी 4500 रुपये भारत सरकार आणि 500 ​​रुपये इंटर्नशिप देणारी कंपनी देईल. या योजनेअंतर्गत निवडलेल्या उमेदवारांची यादी 26 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करता येणार आहे. 27 नोव्हेंबरपर्यंत कंपन्या अंतिम निवड करतील आणि 2 डिसेंबर 2024 पासून 12 महिन्यांसाठी इंटर्नशिप सुरू होईल.