Sovereign Gold Bond 4th Series: नवी दिल्ली : आधीपासूनच महागाईन पिचलेला सर्वसामान्य माणूस वाढलेल्या सोन्याच्या किमतींनीसुद्धा हैराण झाला आहे. तरीदेखील तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल, तर स्वस्तात सोनं खरेदी करण्याची एक संधी तुमच्याकडे आहे. ही संधी म्हणजे, सॉव्हरिन गोल्ड बॉन्ड (Sovereign Gold Bond). रिझर्व्ह बँकेच्या सॉव्हरिन गोल्ड बॉन्ड (Gold Bond) योजनेची चौथी सीरिज (Sovereign Gold Bond 4th Series) आजपासून सुरू होत आहे. या योजनेतंर्गत केंद्र सरकार बाजारभावापेक्षा कमी किमतीत शुद्ध सोनं विकतं. या योजनेंतर्गत सोनं खरेदी करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, तुम्हाला स्वस्तात सोनं खरेदी करता येतंच, पण त्यासोबतच मोठा परतावाही मिळतो. केंद्र सरकारची योजना गुंतवणुकीच्या दृष्टीकोनातून उत्तम पर्याय ठरते.
तुम्ही 16 फेब्रुवारीपर्यंत गुंतवणूक करता येईल
सॉव्हरिन गोल्ड बॉन्ड योजना 16 फेब्रुवारीपर्यंत खुली राहील म्हणजेच, तुमच्याकडे स्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी तुमच्याकडे फक्त 5 दिवसांसाठीच आहे. यापूर्वी, आर्थिक वर्ष 2023-24 साठी सॉव्हरिन गोल्ड बॉन्डचा (SGB Scheme) तिसरा हप्ता गेल्या वर्षी 18 डिसेंबर रोजी जारी करण्यात आला होता, जो 22 डिसेंबरपर्यंत सुरू होती. या योजनेंतर्गत सरकारमार्फत विकलं जाणारं सोनं हे कागदी सोनं किंवा डिजिटल सोन्याचा एक प्रकार आहे, ज्यामध्ये तुम्ही किती प्रमाणात सोनं कोणत्या दरानं खरेदी करत आहात याचं प्रमाणपत्र दिलं जातं. हे डिजिटल सोनं खरेदी करून उत्तम परतावा तुम्ही मिळवू शकता.
सोन्याचा दर कोण ठरवतं?
सॉव्हरिन गोल्ड बॉन्ड योजनेच्या चौथ्या टप्प्याची इश्यू प्राईज 6,263 रुपये प्रति ग्रॅम निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच, बाजारापेक्षा कमी किमतींत तुम्ही येथून सोनं खरेदी करून गुंतवणूक करू शकता. एवढंच नाही तर तुम्ही यामध्ये ऑनलाईन गुंतवणूक केल्यास प्रति ग्रॅम 50 रुपये अतिरिक्त सूटही दिली जाते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या सॉव्हरिन गोल्ड बॉन्ड योजनेतील (Sovereign Gold Bond Scheme) गुंतवणुकीचा मॅच्युरिटी पीरियड 8 वर्ष आहे. सरकारनं नोव्हेंबर 2015 मध्ये ही योजना सुरू केली आणि आतापर्यंत गेल्या 8 वर्षांत ज्या गुंतवणूकदारांनी यामध्ये गुंतवणूक केली आहे त्यांना 12.9 टक्के इतका उत्कृष्ट परतावा मिळाला आहे.
99.9 टक्के शुद्ध सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी
सोन्याची मागणी कमी करण्याच्या उद्देशानं सरकारनं ही सरकारी गोल्ड बॉन्ड योजना सुरू केली होती. यामध्ये केलेल्या गुंतवणुकीवर सरकार सुरक्षिततेची हमी देतं. गुंतवणूकदार हे डिजिटल सोनं रोखीनं देखील खरेदी करू शकतात आणि त्यांना खरेदी केलेल्या सोन्याच्या रकमेइतक्या मूल्याचे सॉव्हरिन गोल्ड बॉन्ड जारी केले जातात. जरी त्याचा मॅच्युरिटी कालावधी 8 वर्ष असला तरी तुम्ही 5 वर्षांनंतर बाहेर पडण्याचा पर्याय निवडू शकता. सॉव्हरिन गोल्ड बॉन्डमध्ये तुम्ही 24 कॅरेट म्हणजेच 99.9 टक्के शुद्ध सोन्यात गुंतवणूक करू शकता.
सॉव्हरिन गोल्ड बाँड योजनेत कोण गुंतवणूक करू शकतं?
सॉव्हरिन गोल्ड बाँड योजना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून चालवण्यात येतं, त्यामुळे ही सरकारी योजना असून यामध्ये सुरक्षेची हमी मिळते. या योजनेअंतर्गत तुम्ही एका वर्षात किमान 1 ग्रॅम आणि जास्तीत जास्त 4 किलो सोनं खरेदी करू शकता. तर ट्रस्ट आणि संस्था एका वर्षात 20 किलो सोने खरेदी करू शकतात.
सॉव्हरिन गोल्ड बाँड योजनेची खास वैशिष्ट्य
तुम्ही ऑनलाईन माध्यमातून सॉव्हरिन गोल्ड बॉन्ड योजनेत गुंतवणूक केल्यास, तुम्हाला सोन्याच्या किमतींमध्ये प्रति ग्रॅम 50 रुपये अतिरिक्त सूट मिळते. सॉव्हरिन गोल्ड बॉन्ड योजनेअंतर्गत, तुम्ही एकूण आठ वर्षांसाठी सोन्यात गुंतवणूक करू शकता. महत्त्वाचं म्हणजे, तुम्ही पाच वर्षांनंतर या योजनेतून बाहेर पडू शकता, तुम्हाला हा पर्याय देखील उपलब्ध आहे. 2015 मध्ये केंद्र सरकारने नोव्हेंबर सर्वात पहिल्यांदा सॉव्हरिन गोल्ड बाँड योजना सुरू केली होती. सॉव्हरिन गोल्ड बाँडमध्ये (SGB) गुंतवणूक केल्याने तुम्हाला प्रतिवर्ष 2.50 टक्के व्याजदराचा लाभ देखील मिळतो. हा व्याज दर सहामाही आधारित असतो.