IREDA Multibagger Share : सरकारच्या निर्णयामुळे गुंतवणूकदारांची चांदी! 'या' निर्णयामुळे IREDA चे शेअर्स दोन महिन्यांत 32 रुपयांवरून 195 रुपयांवर
Rooftop Solar Scheme : शेअर बाजारात लिस्टिंग झाल्यापासून आयआरईडीए (IREDA) कंपनीच्या शेअर्समध्ये झपाट्याने वाढ होत आहे. शुक्रवारी बंद झालेल्या व्यापारी आठवड्यात हा शेअर 195.05 रुपयांवर पोहोचला.
IREDA Multibagger Stock : सरकारच्या निर्णयामुळे काही शेअर मार्केट (Share Market) गुंतवणूकदारांची चांदी झाली आहे. इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड (IREDA) या भारत सरकारच्या कंपनीच्या गुंतवणूकदारांची दररोज चांदी होत आहे. सरकारच्या एका निर्णयामुळे IREDA चे शेअर्स दोन महिन्यांत 32 रुपयांवरून 195 रुपयांवर पोहोचले आहेत. आयआरईडीए (IREDA) चा आयपीओ (IPO) नोव्हेंबर 2023 मध्ये आला होता. या IPO ची किंमत 30 ते 32 रुपये निश्चित करण्यात आली होती. IPO ला गुंतवणूकदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि 38.80 पट सबस्क्रिप्शन घेतलं गेलं. यानंतर, IREDA आयपीओ 56 टक्के प्रीमियमसह 50 रुपयांना शेअर बाजारात सूचीबद्ध झाला. ज्या गुंतवणूकदारांना IPO वाटप करण्यात आले, त्यांना 32 रुपये दराने शेअर्स मिळाले आणि आता हा शेअर 195 रुपयांवर पोहोचला आहे.
32 रुपयांपासून 195 रुपयांपर्यंत प्रवास
IREDA च्या ज्या सुरुवातीच्या गुंतवणूकदारांनी या शेअरमध्ये आपली गुंतवणूक कायम ठेवली आहे. आता गुंतवणूकदारांची गुंतवणूक सहा पटीहून अधिक वाढलेली दिसत आहे. हा नफा आणखी वाढू शकतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. सूचीबद्ध म्हणजेच शेअर बाजारात लिस्टिंग झाल्यापासून IREDA कंपनीच्या शेअर्समध्ये झपाट्याने वाढ होत आहे. शुक्रवारी बंद झालेल्या व्यापारी आठवड्यात हा शेअर 195.05 रुपयांवर पोहोचला. 52 व्या आठवड्यात शेअरमध्ये थोडीशी घसरण झाली आणि हा शेअर 49.99 रुपयांपर्यंत घसरला.
स्टॉक वाढण्याचं कारण काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी राम मंदिराच्या प्राणुप्रतिष्ठेनंतर पंतप्रधान सूर्योदय योजना (PM Suryoday Yojana) जाहीर केली. पंतप्रधान मोदींनी या योजनेअंतर्गत देशातील एक कोटी घरांना सोलर पॅनलचा लाभ देण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अंतरिम बजेटमध्ये 'रूफटॉप सोलर स्कीम'साठी 10,000 कोटी रुपयांची तरतूद केल्याची घोषणा केली आहे. या प्रकल्पातून आयआरईडीएला (IREDA) निधी मिळणार आहे. येत्या काळात हा शेअर वाढून 240 रुपयांचा उच्चांक गाठेल अशी अपेक्षा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
अर्थसंकल्पात घोषणा कोणत्या?
अर्थसंकल्पात केंद्र सरकारने 'पंतप्रधान सूर्योदय योजने'साठी 10,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. PM सोलर पॅनल योजनेंतर्गत देशातील एक कोटी कुटुंबांना दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज मिळू शकेल. यामुळे त्यांचे दरवर्षी 18,000 रुपये वाचतील. या योजनेंतर्गत अर्जासाठी अटींची पूर्तता करणाऱ्या कुटुंबांच्या घरांच्या छतावर सोलर युनिट बसवण्यात येणार आहेत. या योजनेमुळे जनतेला वीज बिलावरील पैसे वाचवण्यास आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्न मिळविण्यात मदत होईल. जर तुमच्याकडे तुमच्या वापरापेक्षा जास्त वीज असेल तर तुम्ही ती विकून आर्थिक नफा मिळवू शकता.
(Disclaimer : ही बातमी केवळ माहितीसाठी आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखीमपूर्ण आहे. शेअर बाजारात व्यवहार करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा. तुमच्या आर्थिक नुकसानीला एबीपी माझा जबाबदार राहणार नाही.)
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Green FD : ग्रीन एफडीमध्ये गुंतवणूक करुन भरघोस नफा मिळवण्याची संधी, SBI सह 'या' बँकांकडून ऑफर