SIP Investment Guide : अनेक जण म्युच्युअल फंडात (Mutual Fund) एसआयपीद्वारे (SIP Investment) गुंतवणूक करतात. एसआयपी (SIP) च्या माध्यमातून गुंतवणूकदार दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवतात. SIP मध्ये गुंतवणूक करणे सोपे असल्याने, जोखीम कमी असते आणि चांगला परतावा मिळतो, त्यामुळे गुंतवणुकीच्या या पर्यायाला अधिक पसंती दिली जाते. म्युच्युअल फंडात SIP द्वारे गुंतवणूक करून सर्वाधिक परतावा कसा मिळवायचा याबाबत सविस्तर वाचा.


कोणताही गुंतवणूकदार जेव्हा बाजारात गुंतवणूक करतो तेव्हा त्याला जास्तीत जास्त परतावा मिळण्याची अपेक्षा असते. बरेच लोक म्युच्युअल फंडामध्ये सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) मध्ये गुंतवणूक करतात. SIP च्या माध्यमातून गुंतवणूकदार दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवतो.


लवकरच गुंतवणूक करण्यास सुरुवात करा


जास्तीत जास्त परतावा मिळविण्यासाठी तुम्ही शक्य तितक्या लवकर गुंतवणूक सुरू करणे फार महत्वाचे आहे. बहुतेक SIP दीर्घकालीन गुंतवणूक असतात. तुमचा पैसा जितका जास्त वेळ गुंतवला जाईल, तितका वेळ जास्त फायदा वाढतो. तुम्ही खूप पैसे गुंतवलेच पाहिजे असे नाही, तुम्ही फक्त 500 रुपयांपासून एसआयपी सुरू करू शकता.


नियमितपणे गुंतवणूक करा


एसआयपीमध्ये गुंतवणूक करताना नियमितपणा आवश्यक आहे. जर तुम्ही नियमितपणे गुंतवणूक केली नाही, तर तुम्हाला तुमची आर्थिक उद्दिष्टे गाठण्यात अडचण येऊ शकते. SIP मध्ये तुम्हाला दर महिन्याला नियमितपणे ठराविक रक्कम जमा करावी लागेल. तरच, तुम्हाला त्यातून जास्त नफा कमावता येईल. बाजारातील मंदीच्या भीतीने तुम्ही तुमची SIP मधील गुंतवणूक थांबवू नये.


SIP गुंतवणुकीची रक्कम वाढवा


तुमचे उत्पन्न वाढत असताना, तुमच्या SIP मध्ये गुंतवलेली रक्कम वाढवणं फायदेशीर ठरेल. तुम्ही SIP मधील गुंतवणुकीची रक्कम हळूहळू वाढवा, यामुळे तुम्हाला अधिक परतावा मिळण्यात मदत होईल.


तुमच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणा


गुंतवणूकदारांनी कधीही एकाच ठिकाणी पैसे गुंतवण्याची चूक करु नये. जर तुम्ही एकाच ठिकाणी पैसे गुंतवले आणि बाजार कोसळला तर तुमचे मोठं नुकसान होऊ शकते. त्यामुळे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्यासाठी इक्विटी, सोने, रिअल इस्टेट म्युच्युअल फंड आणि इतर फंड यासारख्या विविध ठिकाणी गुंतवणूक करणं गरजेचं आहे. यामुळे एखाद्या क्षेत्रात मंदी आली तरी तुमचं जास्त नुकसान होणार नाही.


योग्य फंड निवडा


जास्त परतावा मिळविण्यासाठी योग्य म्युच्युअल फंड निवडणं फार महत्वाचं आहे. तुमच्या गुंतवणुकीच्या उद्दिष्टांना अनुकूल असा म्युच्युअल फंड निवडून त्यामध्ये गुंतवणूक करा.




(Disclaimer : ही बातमी केवळ माहितीसाठी आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखीमपूर्ण आहे. शेअर बाजारात व्यवहार करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा. तुमच्या आर्थिक नुकसानीला एबीपी माझा जबाबदार राहणार नाही.)