Pakistan Economic Crisis News:  कंगाल पाकिस्तानमध्ये जून 2022 नंतर शेअर बाजारात सर्वात मोठी घसरण दिसली. पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज (PSX) KSE-100 चा प्रमुख निर्देशांक मंगळवारी 1378.54 अंकांनी म्हणजेच 3.47 अंकांनी घसरून 38342.21 वर बंद झाला. दिवसाच्या व्यवहारात निर्देशांक 1,432.94 अंकांनी घसरून 38,287.81 च्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता. 


वास्तविक देशातील राजकीय अस्थिरतेमुळे आधीच पाकिस्तानच्या बाजारपेठेवर दबाव होता, त्याच दरम्यान, सरकारच्या IMF सोबतच्या कराराला विलंब झाल्याच्या बातम्या समोर आल्या. या दोन्ही घटकांचा बाजारावर वाईट परिणाम झाला आणि भागधारकांनी मोठ्या प्रमाणात शेअर्स विकण्यास सुरुवात केली.


एका शेअर बाजारातील तज्ज्ञाचा हवाला देत पाकिस्तानी वृत्तपत्र DAWN च्या वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या एका बातमीनुसार, आयएमएफची गुंतागुंतीची परिस्थिती, विनिमय दर व्यवस्थापनातून घेतलेली माघार आणि गॅसच्या वाढलेल्या किंमती यांनी या विक्रीला गती देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. डॉन वृत्तपत्राने बाजाराला कदाचित हे देखील समजले असेल की सेंट्रल बँकेची चलनविषयक धोरण समिती (एमपीसी) व्याजदर वाढवेल. त्यामुळे बाजारावरही दबाव वाढल्याचं म्हटलं आहे.


आयएमएफची मागणी


आयएमएफने वीज आणि गॅसच्या किमती वाढवाव्यात, पेट्रोलचे दर वाढवावेत आणि अतिरिक्त कर लावावा अशी मागणी केल्याचं दलाल सिक्युरिटीजचे सीईओ सिद्दीकी दलाल यांनी सांगितले. याशिवाय देशात ज्या प्रकारे राजकीय अस्थिरता पसरली आहे, संसद बरखास्त करून काळजीवाहू सरकार स्थापन केले तर आयएमएफसोबतची चर्चा कशी यशस्वी होईल, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली. जर पाकिस्तानने वरील अटी मान्य केल्या नाहीत तर विस्तारित निधी सुविधा (EFF) अंतर्गत आयएमएफकडून मिळणारी एक अरब डॉलर आर्थिक मदत धोक्यात येऊ शकते.


पंजाब आणि खैबर पख्तूनख्वामध्ये राजकीय उलथापालथ


पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात विधानसभा विसर्जित करण्यात आली आहे. आतापर्यंत तेथे कोणालाही हंगामी मुख्यमंत्री करण्यात आलेले नाही. याशिवाय खैबर पख्तुनख्वा प्रांताचे मुख्यमंत्री महमूद खान देखील राज्यपालांना पत्र पाठवून विधानसभा विसर्जित करण्याची विनंती करू शकतात. पाकिस्तानचा परकीय चलन गंगाजळी अत्यंत वाईट स्थितीत पोहोचली आहे. पाकिस्तानचा परकीय चलनाचा साठा सध्या $4.34 अब्ज डॉलर आहे, जो फेब्रुवारी 2014 नंतरचा सर्वात कमी आहे.