मुंबई : भारताचा शेजारी देश पाकिस्तान आता जवळपास कंगाल झाल्यात जमा आहे. पाकिस्तानची आर्थिक घडी आता पूर्णपणे बिघडली असून देश अराजकतेच्या वाटेने जातोय की काय अशी परिस्थिती आहे. पाकिस्तानमधील व्यापाऱ्यांवर आता एक कर लावण्यात आला आहे. प्रोफेशनल टॅक्स असं त्याचं नाव असून त्यामुळे रावळपिंडीतील व्यापारी आणि दुकानदार चांगलेच अडचणीत सापडले आहेत.
रावळपिंडीतील व्यापाऱ्यांमध्ये संताप
एक्स्प्रेस ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, पाकिस्तानध्ये व्यापाऱ्यांवर प्रोफेशनल टॅक्स लावण्यात आला असून त्यामुळे व्यापाऱ्यांनमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या करामुळे दैनंदिन वस्तू महाग होण्याची भीती आहे. पाकिस्तानमधील व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण होण्याचे कारण म्हणजे दुकानदारांना 50 हजार ते 2 लाख पाकिस्तानी रुपयांपर्यंत (PKR) व्यावसायिक बिले भरण्याचे आदेश देण्यात आली आहेत. भारतीय चलनात पाहिले तर त्याची रक्कम 15 हजार ते 61 हजार रुपये इतकी होते.
एक्स्प्रेस ट्रिब्यूनच्या वृत्तात म्हटले आहे की, व्यावसायिक कर दर वाढल्यानंतर रावळपिंडी विभागातील व्यापाऱ्यांमध्ये संताप आहे. व्यापारी संघटनांमध्ये याबाबत दोन प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. रावळपिंडी सेंट्रल ट्रेड युनियनचे प्रमुख मरकाजी अंजुमन ताजरन म्हणतात की, व्यापाऱ्यांनी हा अनावश्यक आणि चुकीचा कर भरू नये.
दूध, दही, ब्रेड आदींच्या किमतींबाबत चिंता
मार्कजी अंजुमनच्या म्हणण्यानुसार, व्यावसायिक कराच्या दरात वाढ झाल्यामुळे सर्वात मोठा परिणाम हा दैनंदिन वस्तूंवर होणार आहे. पाकिस्तानमध्ये दूध, दही आणि ब्रेडच्या किमतीत वाढ होईल आणि ते महाग होतील. रावळपिंडीच्या भागात दूध आणि ब्रेडसारख्या पदार्थांच्या किमतीत वाढ होणार आहे. या महागड्या पदार्थांमुळे सर्वसामान्यांना खूप अडचणी येऊ शकतात. यापूर्वी व्यापाऱ्यांना अशी कराची बिले कधीच आली नसल्यामुळे सर्वसामान्यांवरही त्याचा बोजा वाढणार आहे.
याआधी रावळपिंडीमधील व्यापाऱ्यांवर 1500 ते 3000 पाकिस्तानी रुपयांचा कर लावला जात होता. तो भरणे या व्यापाऱ्यांना सोपं जात होतं. आता त्या करामध्ये कित्येक पटींनी वाढ होऊन तो 50 हजार ते 2 लाखांवर पोहोचला आहे. त्यामुळेच पाकिस्तानच्या व्यापाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाल्याचं दिसून येत आहे.
ही बातमी वाचा: