Onion Price News: देशात महागाई (inflation) वाढू नये म्हणून सरकार सातत्यानं शेतमालाच्या संदर्भात विविध धोरणं आखत आहे. कांद्याचे दर नियंत्रणात राहावे म्हणून सरकारनं डिसेंबर 2023 मध्ये कांद्याच्या निर्यातीवर बंदी (onion Export Ban) घातली होती. यानंतर आता 3 मे रोजी सरकारनं (Govt) कांद्याच्या निर्यातीवरील बंदी हटवली आहे. निर्यातबंदी हटवून 4 दिवस झाले तरीदेखील अद्याप कांद्याच्या दरात वाढ झालेली नाही. याचा शेतकऱ्यांना फटका बसतोय. जाणून घेऊयात कोणत्या बाजारपेठेत कांद्याला किती दर मिळतोय.
अनेक ठिकाणी एक किलो कांद्याला मिळतोय 2 ते 3 रुपयांचा दर
कांदा निर्यातबंदी हटवून चार दिवस झाले आहेत. अद्यापही कांद्याच्या दरात वाढ झालेली दिसत नाही. काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या कांद्याला 2 रुपाचा देखील दर मिळत आहे. अनेक शेतकऱ्यांना 2 रुपये ते 10 रुपये प्रति किलोच्या दरम्यानचा दर मिळत आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार संगमनेरमध्ये एक किलो कांद्याला 2 ते 3 रुपयांचा दर मिळाला. तर येवल्यात प्रतिकिलो कांद्याला 3 रुपये तर मनमाडमध्ये प्रतिकिलो कांद्याला 4 रुपयांचा दर मिळाला आहे. दरम्यान, कांद्याची निर्यात खुली होऊन देखील शेतकऱ्यांच्या कांद्याला दर मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत.
कांद्यावरील निर्यातबंदी उठवून देखील दर का वाढत नाही?
दरम्यान, कांद्यावरील निर्यातबंदी उठवून देखील दर का वाढत नाही? असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. तर याच उत्तर आहे सरकारचं धोरण. कारण, सरकारनं कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवली खरी पण निर्यातीसाठी प्रति टन 550 डॉलर किमान निर्यात मूल्य आकारले आहे. तर 40 टक्के निर्यात शुल्क आहे. त्यामुळं निर्यातबंदी उठवून देखील कांदा निर्यात होण्याची शक्यता कमीच आहे. कारण किमान निर्यात मूल्य आणि निर्यात शुल्क लागू केल्याचा फटका बसत आहे. दरम्यान, या अटी शर्ती लागू न करता कांद्याच्या निर्यात केली जावी अशी मागणी विविध शेतकरी संघटनांनी केली आहे.
कोणत्या बाजारात कांद्याला किती दर?
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार नागपूरच्या बाजारात प्रति क्विंटल कांद्याला किमान भाव फक्त 1000 रुपये, तर कमाल 1500 रुपये आहे. तर सरासरी 1325 रुपये प्रतिक्विंटलला दर मिळत आहे. तर अकोला बाजारात कांद्याला किमान 800 रुपये तर कमाल 1500 रुपयांचा दर मिळत आहे. तर सरासरी दर हा 1200 रुपये मिळत आहे. चंद्रपूरच्या बाजारात किमान भाव 1300 रुपये, कमाल 2000 रुपये आणि सरासरी 1600 रुपये प्रतिक्विंटल मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या: