बंगळुरु : ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीकडून तोटा कमी करण्यासाठी विविध पदांवरुन जवळपास 1000 कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. ओला इलेक्ट्रिकच्या शेअरमध्ये देखील मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्याच पार्श्वभूमीवर आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी कंपनी जवळपास एक हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. कंपनीकडे सध्या जवळपास 4000 कर्मचारी आहेत. त्यापैकी 25 टक्के कर्मचाऱ्यांना ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीमधून घरी पाठवलं जाऊ शकतं. 

ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीचा शेअर गेल्या काही दिवसांपासून घसरला होता. त्यामध्ये कर्मचारी कपातीची बातमी येताच शेअर आणखी गडगडला. कंपनीचा शेअर काल 52 आठवड्यांच्या निचांकी पातळीवर पोहोचला होता. कंपनीचा शेअर 53.7 रुपयांवर आला होता. काल बाजार संपला तेव्हा 55.18 रुपयांवर होता. 

ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीचे प्रमुख भवीश अग्रवाल यांच्याकडून नोव्हेंबर 2024 पासून पुनर्रचना योजना सुरु करण्यात आली होती. त्यानुसार कंपनीत विविध पदांवर काम करणाऱ्या कामगारांना कामावरुन कमी केलं जाऊ शकतं. ओलाकडून अद्याप किती कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केलं जाईल, याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, कंपनीच्या प्रवक्त्यांनी फेररचना केल्यानं ग्राहक सेवांमध्ये सुधारणा झाल्याचं म्हटलं. याशिवाय उत्पादन वाढवण्यासाठी ज्या गरजेच्या नसलेल्या पदांना रद्द करण्यात आलं आहे. 

ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीनं 2002 मध्ये आयपीओ आणून पुनर्रचना केली होती. ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीचा आयपीओ 2 ऑगस्ट 2024 ला आला होता. ओला इलेक्ट्रिकचा शेअर उच्चांकी पातळीवरुन 60 टक्क्यांनी घसरला आहे. 

गेल्या वर्षभरापासून ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीला ग्राहकांकडून सोशल मीडियावर टीकेचा सामना करावा लागला आहे. याशिवाय कंपनीला प्रतिस्पर्धी कंपन्यांकडून होणाऱ्या स्पर्धेमुळं बाजारातील भागिदारी गमवावी लागली आहे. 

ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीची स्पर्धा एथर, बजाज, एम्पियर, हीरो मोटोकॉर्प, टीव्हीएस मोटर या सारख्या कंपन्यांसोबत आहे. या कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. 

चालू आर्थिक वर्षात ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत ओला इलेक्ट्रिकचा तोटा 564 कोटी रुपये झाल्याचं समोर आलं आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या 2023 मध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीचा तोटा 376 कोटी रुपये होता. सप्टेंबरला संपलेल्या तिमाहीत  कंपनीच तोटा 495 कोटी रुपये होता.  

तिसऱ्या तिमाहीत कंपनीचं उत्पन्न 19.36 टक्क्यांनी घटलं असून ते 1045 कोटी रुपये झालं. जो गेल्या वर्षीच्या तिमाहीत 1296 कोटी रुपये होते.

ओला इलेक्ट्रिकनं शेअर धारकांना एक पत्र लिहिलं होतं त्यात ऑक्टोबरमध्ये सणांच्या काळात विक्री वाढलेय मात्र मोठी स्पर्धा आणि सर्व्हिसचं आव्हान  असल्यानं ऑक्टोबर ते डिसेंबरची कामगिरी कमजोर राहिल्याचं म्हटलं. सर्विसशी संबंधित  समस्या दुरुस्त केल्या असून नेटवर्क वाढवत आहोत, असं ओलानं म्हटलं. चालू आर्थिक वर्षातील कंपनीचा निव्वळ तोटा 1406 कोटी झाला आहे.

इतर बातम्या :

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फेब्रुवारीचे 1500 रुपये 7 मार्चला खात्यात येणार, 4 ते 5 लाख महिलांची संख्या घटणार, कारण...

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)