Nestle Global Job Cuts 2025 नवी दिल्ली: देशातील सर्वात मोठी फास्ट मुव्हिंग कंझ्युमर गुडस क्षेत्रातील कंपनी नेस्लेकडून कर्मचारी कपात केली जाणार आहे. कंपनी एकूण 16 हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याच्या तयारीत आहे. ही संख्या नेस्लेच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या 6 टक्के आहेत. नेस्लेचे नवे सीईओ फिलिप नवरातिल यांच्याकडून हे पाऊल उचलण्यात आलं आहे.
फिलिप नवरातिल यांनी काहीच दिवसांपूर्वी नेस्ले कंपनीत पदभार स्वीकारला आहे. नवरातिल म्हणाले की संपूर्ण जग वेगानं बदलत आहे. नेस्लेला देखील याच वेगानं बदलावं लागेल. यासाठी काही कठोर आणि आवश्यक पावलं उचलावी लागणार आहेत. ते यासाठी तयार आहेत. उदा. कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्यासारखी पावलं उचलणे.
कर्मचारी कपातीवर नेस्लेची भूमिका
नेस्लेनं दिलेल्या माहितीनुसार ही कर्मचारी कपात 2 वर्षाच्य कालावधीमध्ये पूर्ण होईल. लेऑफमध्ये 16 हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं जाईल. जागतिक स्तरावर कर्मचारी कपात केलील जाईल. म्हणजेच, नेस्ले जगातील त्यांच्या प्रत्येक शाखेतून कर्मचाऱ्यांना कमी करेल. व्यवस्थापनातील 12 हजार आणि सप्लाई चेन क्षेत्रातील 4000 कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केलं जाईल.
नेस्लेच्या सीईओकडून माहिती
नेस्लेचे सीईओ फिलिप नवरातिल यांनी 2001 मध्ये कंपनी जॉईन केली होती. प्रदीर्घ अनुभवानंतर ते या पदावर पोहोचले आहेत. या कामगार कपातीमुळं कंपनीला 1 अब्ज स्विस फ्रँकचा फायदा होईल. जो निश्चित केलेल्या रकमेच्या दुप्पट आहे. नवरातिल यांनी गेल्या 9 महिन्यांपासून कंपनीच्या उत्पादनांची विक्री 1.9 टक्क्यांनी घटल्याची माहिती दिली.
नवरातिल यांनी त्यांच्या वक्तव्यातून संकेत दिले आहेत की ते कंपनीत काही मोठे बदल करु शकतात. त्यास असे यूनिटस जे चांगली कामगिरी करत नाहीत, त्यांच्या विक्री करण्याच्या योजनेवर काम केलं जाऊ शकतं. 16 हजार कर्मचाऱ्यांची कपात हा देखील नवरातिल यांच्या संकेताचा भाग समजला जातोय. नेस्लेचा नफा मार्जिन देखील घटला आहे. जो गेल्या वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत 986 कोटींवरुन 753 कोटींवर आला आहे.