नागपूर : देशातील सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत एक्स्प्रेस नागपूर च्या अजनी ते पुणे दरम्यान सुरु होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अजनी-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला. अजनी ते पुणे अंतर 881 किलोमीटर आहे. नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा जोरदार प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. कारण ही रेल्वे सुरू झाल्यानंतर पहिल्याच रविवार साठी वेटिंग लिस्ट तयार झाली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10ऑगस्ट रोजी या रेल्वेला ऑनलाइन हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन केले होते. त्यानंतरच्या 17 ऑगस्ट या पहिल्या रविवार साठी प्रवाशांनी जोरदार अग्रिम बुकिंग (रिझर्वेशन) केल्यामुळे आता वेटिंग लिस्ट तयार झाली आहे.. तर इतर दिवसांसाठीही पुणे जाणाऱ्या प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे नागपूर - पुणे वंदे भारत रेल्वेसाठी फायद्याची ठरेल असा चित्र सध्यातरी दिसून येत आहे.

विशेष म्हणजे यापूर्वी सुरू झालेल्या नागपूर सिकंदराबाद या वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा थंड प्रतिसाद मिळाल्यानंतर नागपूर पुणे वंदे भारत फक्त आठ डब्यांची म्हणजेच सुमारे 400 प्रवाशांच्या क्षमतेनेच सुरू करण्यात आली आहे.

नागपूर (अजनी)- पुणे प्रवासाचे तिकीट किती?

अजनी ते पुणे एसी चेअर कार यासाठी एका तिकिटाची रक्क 2140 रुपये निश्चित करण्यात आली आहे. तर, यातून प्रवासी जेवण घेणार नसेल तर त्याचे 545 रुपये वजा होतील. म्हणजेच  1595 रुपये असेल. याशिवाय एक्झिक्युटिव्ह चेअर कारच्या तिकीटाची किंमत 3815 रुपये इतकी आहे. प्रवासी जर जेवण घेणार नसेल तर त्यामधून 628 रुपये कमी होतील. 

पुणे ते नागपूर प्रवासाचं तिकीट किती?

पुणे अजनी नागपूर प्रवासाचं वंदे भारत एक्स्प्रेसचं एसी चेअर कारचं तिकीट 2040 रुपये आहे. जेवणाचे 445 रुपये कमी केल्यास तिकीट 1595 रुपये असेल. तर,  एक्झिक्युटिव्ह चेअर कारच्या तिकिटाची रक्कम 3725 रुपये आहे. यातून जेवणाचे 539 रुपये कमी केले जाऊ शकतात. 

अजनी ते पुणे वंदे भारत एक्स्प्रेसला वर्धा, बडनेरा, अकोला जंक्शन, शेगांव, भुसावळ, जळगाव,मनमाड, कोपरगाव, अहमदनगर, दौंड कॉर्डलाईन हे थांबे आहेत. अजनी ते पुणे दरम्यान धावणारी ही वंदे भारत ट्रेन महाराष्ट्र साठी मिळालेली 12 वी वंदे  भारत आहे.

अजनी ते पुणे वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यातून 6 दिवस (सोमवार वगळता)धावेल. अजनी वरून सकाळी 09:50 वाजता सुटणारी वंदे भारत त्याच दिवशी रात्री 21:50 वाजता पुणे येथे पोहोचेल.पुणे ते अजनी वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यातून 6 दिवस (मंगळवार वगळता) धावेल.पुण्यातून सकाळी 06:25 वाजता सुटून वंदे भारत त्याच दिवशी संध्याकाळी 18:25 वाजता अजनी येथे पोहोचेल.