मुंबई महापालिकेवर कर्जाचे ओझे! तब्बल 2.44 लाख कोटींचा आर्थिक बोजा, आर्थिक ताण वाढला
सागरी किनारा मार्गाचा उपनगरीय टप्पा, जलबोगदे, गोरेगाव–मुलुंड जोडरस्ता, रस्त्यांचे काँक्रीटीकरण तसेच पुलांच्या उभारणी आणि दुरुस्तीमुळे पालिकेची एकूण देणी आता 2.44 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहेत
मुंबई : मुंबई महानगरपालिकेने 2026-27 साठी 80952 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला असला तरी विविध पायाभूत प्रकल्पांमुळे पालिकेवरील आर्थिक दायित्व मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सागरी किनारा मार्गाचा उपनगरीय टप्पा, जलबोगदे, गोरेगाव–मुलुंड जोडरस्ता, रस्त्यांचे काँक्रीटीकरण तसेच पुलांच्या उभारणी आणि दुरुस्तीमुळे पालिकेची एकूण देणी आता 2.44 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहेत. या प्रकल्पांसाठी आगामी आर्थिक वर्षात 41 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र जानेवारी 2026 अखेर पालिकेच्या मुदतठेवी सुमारे 81 हजार कोटी रुपयांपर्यंत असून प्रकल्पांची देणी या रकमेच्या तिप्पट असल्याने आर्थिक ताण वाढत असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या काही वर्षांत प्रकल्प खर्च सातत्याने वाढला आहे. 2023-24 मध्ये ही देणी 1.90 लाख कोटी रुपये होती, ती 2024-25 मध्ये 2.32 लाख कोटींवर गेली आणि आता 2.44 लाख कोटींचा टप्पा ओलांडला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात भांडवली कामांसाठी 48164 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पालिकेचे उत्पन्न अपेक्षेइतक्या वेगाने वाढत नसल्याने खर्च भागवण्यासाठी मुदतठेवी आणि राखीव निधीचा वापर केला जात आहे. तसेच चालू वर्षात 13765 कोटी रुपयांचे अंतर्गत कर्ज घेण्याचीही योजना आहे. परिणामी, देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळख असलेल्या मुंबई महापालिकेवर वाढत्या प्रकल्प खर्चामुळे आर्थिक ताण वाढत असल्याचे या अर्थसंकल्पातून स्पष्ट झाले आहे.
























