Multibagger Share मुंबई: भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून घसरण सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून त्यांच्याकडे असलेल्या भारतीय कंपन्यांच्या समभागांची विक्री करण्यात येत असल्यानं त्याचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र, गेल्या वर्षभरात काही कंपन्यांच्या स्टॉकनं दमदार परतावा दिला आहे. आदित्य व्हिजन लिमिटेड या कंपनीच्या स्टॉकनं गुंतवणूकदारांना गेल्या पाच वर्षात 23400 टक्के रिटर्न दिला आहे. मल्टी ब्रँड कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स रिटेल चेन व्यवसायात ही कंपनी काम करते. पाच वर्षांपूर्वी जो शेअर 5 रुपये देखील नव्हता तो आज 425 रुपयांवर पोहोचला आहे.
आदित्य व्हिजन लिमिटेड शेअर 5 वर्षांपूर्वी म्हणजेच 11 मार्च 2020 ला बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 1.8 रुपये होता. पाच वर्षानंतर 17 मार्च 2025 ला या शेअरची किंमत 424.70 रुपये होता. या दरम्यान गुंतवणूकदारांना 23494.44 टक्के रिटर्न मिळाला आहे. या हिशोबानं गणित केल्यास 5 वर्षांपूर्वी एखाद्या व्यक्तीनं 25000 रुपयांची गुंतवणूक या स्टॉकमध्ये केली असल्यास त्याची रक्कम 60 लाख रुपये झाली असेल. जर एखाद्यानं या कंपनीचे 50000 शेअर खरेदी केले असतील त्याची रक्कम 1 कोटी रुपये झाली. तर, ज्या व्यक्तीनं या स्टॉकमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक पाच वर्षांपूर्वी केली असेल त्याची रक्कम 2 कोटींपेक्षा अधिक झाली असेल.
गेल्या एक वर्षात आदित्य व्हिजन लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये साधारणपण 30 टक्के वाढ झाली आहे. मात्र, 2025 मध्ये या स्टॉकमध्ये 18 टक्के घसरण झाली आहे. डिसेंबर 2024 पर्यंत या कंपनीत प्रमोटर्सची भागिदारी 53.23 टक्के आहे.
डिसेंबरच्या तिमाहीत 24 कोटी फायदा
आदित्य व्हिजन लिमिटेड या कंपनीला ऑक्टोबर ते डिसेंबर 2024 दरम्यानच्या तिमाहीत एकूण 50.45 कोटींचं उत्पन्न मिळालं. यामध्ये निव्वळ नफा 24.22 कोटी रुपये झाला आहे.
आदित्य व्हिजन लिमिटेडची सुरुवात 1999 मध्ये बिहारच्या पाटनामध्ये एका रिटेल स्टोअरद्वारे झाली होती. आता बिहारच्या सर्व जिल्ह्यांमध्ये, झारखंड आणि उत्तर प्रदेशातील पूर्वांचल भागातील सर्व प्रमुख शहरात कंपनीची स्टोअर आहेत. कंपनीचं बाजारमूल्य 5400 कोटी रुपये आहे.
सेन्सेक्समध्ये 341.04 अंकांची वाढ
जागतिक बाजारातील तेजी आणि बँकिंग शेअरच्या खरेदीमुळं सोमवारी भारतीय शेअर बाजारातील पाच दिवसांच्या घसरणीला ब्रेक लागला. सेन्सेक्समध्ये 341.04 अंकांची वाढ होऊन तो 74169.95 अंकांवर पोहोचलाय. तर निफ्टी 50 मध्ये 111.55 अंकांची वाढ होऊन तो 22508.75 पर्यंत पोहोचला.
इतर बातम्या :
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)