मुंबई : महायुती सरकारची महत्त्वकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची  (Ladki Bahin Yojana) स्क्रूटिनी मागील १५ दिवसांपासून सुरू करण्यात आल्याची माहिती आहे. ही स्क्रूटिनी राज्यपातळीवर आणि जिल्हा पातळीवर खात्याकडून सुरु आहे. सध्या राज्यपातळीवर करण्यात आलेल्या स्क्रुटीनी मधे 5 लाखांपेक्षा जास्त महिलांकडून नियमांची पायमल्ली केल्याचं उघड झालं आहे.  

 महिला व बाल विकास विभागाकडून या स्क्रूटीनीसाठी संजय गांधी निराधार योजना, परिवहन विभाग, नमो शक्ती योजनेची मदत घेण्यात आली. विभागाला आतापर्यंत आयकर विभागाची माहिती विभागाला आलेली नाही. 

सर्व अर्जांची पडताळणी होण्यासाठी मार्च महिना उघडण्याची शक्यता आहे, अशी माहिती मिळाली आहे.  

महिला व बालकल्याण खात्याकडून जिल्हा पातळीवर स्वेच्छेने पैसे माघारी करण्यात आलेल्या महिलांचा डेटा गोळा करण्याचं अद्याप काम सुरू असल्याची माहिती आहे. दिवसेंदिवस आकडेवारी बदलत असल्याने मार्च महिन्यात स्क्रूटिनी पूर्ण झाल्यानंतर विभागाच्या हाती मोठा आकडा लागण्याची शक्यता आहे, अशी सूत्रांची माहिती आहे.   

जानेवारीत 5 लाख लाभार्थी घटले

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे जानेवारी महिन्यात 2 कोटी 41 लाख महिलांच्या खात्यात रक्कम वर्ग करण्यात आली होती. तर, डिसेंबर महिन्यात 2 कोटी 46  लाखांहून अधिक लाडक्या बहिणींना ही रक्कम देण्यात आली होती. 65 वर्षांपेक्षा अधिक वय झाल्यानं साधारणपणे दीड लाख महिलांची नावं योजनेतून कमी झाली आहेत. याशिवाय संजय गांधी निराधार योजनेच्या काही लाभार्थ्यांनी देखील योजनेचा लाभ घेतल्याचं उघड झालं आहे.  

लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? 

महायुती सरकारनं  विधानसभा निवडणुकीच्या काळात पुन्हा सत्ता आल्यास लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देण्याची घोषणा केली होती. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांकडून 2100 रुपये कधी मिळणार याची प्रतीक्षा केली जातेय. तर, सरकारकडून या संदर्भातील निर्णय अर्थसंकल्पानंतर होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. याशिवाय महिला व बालविकास विभागानं लाडकी बहीण योजनेला बळकटी देण्यासाठी 5 कोटी रुपयांच्या संगणक खरेदीला मंजुरी दिली होती. तर, प्रचार आणि प्रसिद्धीसाठी 3 कोटींच्या मीडिया प्लॅनला मंजुरी दिली आहे. 

लाडकी बहीण योजनेच्या अटी

1. महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक.2. राज्यातील विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.3. किमान वयाची 21 वर्षे पूर्ण व कमाल वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत.4. लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे.5. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे.

इतर बातम्या : 

Ladki Bahin Yojana : जानेवारी महिन्यात लाडक्या बहिणींची संख्या 5 लाखानं घटली, आणखी लाभार्थी कमी होणार? नेमकं कारणं काय?