Ladki Bahin Yojana मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारकडून जुलै 2024 पासून सुरु करण्यात आलेली आहे. ही योजना ज्यावेळी सुरु करण्यात आली तेव्हाची लाभार्थी संख्या 2 कोटी 46 लाख इतकी होती. एप्रिल 2026 मध्ये लाडक्या बहिणींची संख्या कमी होऊन 1 कोटी 77 लाखांवर आलेली आहे. राज्य सरकारकडून काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात 1500 रुपयांची रक्कम जमा करण्यात आली. ही योजना महिला व बालविकास विभागाकडून चालवली जाते. यातील लाभार्थी महिलांना सुरुवातीला ई केवायसी करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं, त्यानंतर ई केवायसी दुरुस्तीसाठी देखील 30 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती.
एप्रिल महिन्यातील लाभार्थींची संख्या
महाराष्ट्र सरकारनं ही योजना ज्यावेळी सुरु केली तेव्हा या योजनेचे निकष देखील जाहीर केले होते. त्यानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी काही पात्रतेच्या अटी लावण्यात आल्या होत्या. ज्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाख रुपयांच्या आत असेल त्या कुटुंबातील महिला पात्र असा निकष करण्यात आला होता. या निकषानुसार पडताळणी करण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. काही महिलांनी ई केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडल्यानं त्यांना दुरुस्तीसाठी 30 एप्रिलपर्यंत संधी देण्यात आली होती.
ई केवायसी दुरुस्तीनंतर एप्रिलमध्ये पात्र लाडक्या बहिणींची संख्या 1 कोटी 77 लाख इतकं असल्याचं स्पष्ट झालं आहे. म्हणजेच जवळपास 70 लाख महिलांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यानं किंवा इतर कारणांमुळं त्या अपात्र ठरल्या आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची संख्या कमी झाल्यानंतर सरकारवरील आर्थिक दबाव देखील कमी झाला आहे.
शेवटचा पर्याय काय?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाईन ई केवायसीची प्रक्रिया पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळं आता एखाद्या पात्र असलेल्या महिलेला कागदपत्रांची पूर्तता करायची असल्यास जिल्हा महिला विकास विभागात कागदपत्रं सादर करावी लागतील.
लाडक्या बहिणींना दोन्ही महिन्यांचे पैसे एकाच वेळी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे 14 मे आणि 15 मे पासून देण्यात येत आहेत. 24 मार्चपासून लाडकी बहीण योजनेच्या पैशांची वाट पाहणाऱ्या महिलांना यामुळं दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ज्या महिला पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचा लाभ घेतात त्यांना 500 रुपये दिले जातात.
