Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, ई-केवायसी दुरुस्तीसाठी शेवटची संधी, 31 मार्चपर्यंत पोर्टल सुरु, जानेवारीचे 1500 रुपये कधी मिळणार?
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ई-केवायसी दुरुस्तीसाठी आणखी एक संधी मिळाली आहे.

छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अनेक लाभार्थी महिलांकडून पैसे मिळाले नसल्यानं राज्यभरात विविध ठिकाणी मोर्चे काढण्यात आले होते. ई- केवायसी संदर्भातील पर्याय निवडताना काही चुकीचे पर्याय निवडले गेल्यानं महिलांचे पैसे थकले असल्याची चर्चा होती. अखेर महिला व बाल विकास विभागानं ई-केवायसीचं पोर्टल पुन्हा सुरु केलं आहे. आजपासून या पोर्टलवरुन ई-केवायसी दुरुस्ती 31 मार्चपर्यंत करता येणार आहे.
Ladki Bahin Yojana : 31 मार्चपर्यंत ई केवायसी दुरुस्ती करता येणार
लाडकी बहीण ई-केवायसी पोर्टल आजपासून सुरू करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून ई-केवायसी पोर्टल बंद असल्याने लाडक्या बहिणींचे पैसे थांबले होते. राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाने आदेश काढून पोर्टल सुरू केले आहे. या निर्णयामुळं लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला असून आता 31 मार्चपर्यंत ई-केवायसी दुरुस्ती करता येणार आहे.
यापूर्वी मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांनी e-KYC माध्यमातून 31 डिसेंबर 2025 पर्यंत आधार प्रमाणीकरण करुन e-KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र ती प्रक्रिया पूर्ण करताना लाभार्थी महिलांकडून "लाभार्थ्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी/कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नसावा किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहे किंवा कसे" याबाबत पर्याय निवडताना चुकीचा पर्याय निवडला गेल्या असल्याचे निदर्शनास आले आहे.
योजनेतील निकषाच्या अनुषंगाने सदर लाभार्थी महिलांची सखोल तपासणी करुन लाभार्थ्यांच्या पात्रता/अपात्रतेची प्रत्यक्ष पडताळणी (Physical Verification) करण्याबाबत सर्व संबंधित जिल्हाधिकारी यांना शासनानं 20 जानेवारी रोजी कळवलं होतं.
या लाभार्थ्याची जलदगतीने पडताळणी करण्याकरिता ऑनलाईन e-KYC मध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी देण्यात यावी, अशी मागणी योजनेच्या लाभार्थ्यांकडून व क्षेत्रिय कार्यालयाकडून होत होती. यामुळं ई केवायसी प्रक्रिया करताना चुकीचा पर्याय निवडणाऱ्या महिलांना सुधारणा करण्याची एक संधी देण्यात आली आहे. ही सुधारणा 31 मार्च 2026 पर्यंत करता येणार आहे.
जानेवारीचा हप्ता कधी मिळणार?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडेही पात्र महिलांचं लक्ष लागलं आहे. डिसेंबर महिन्याचा हप्ता 14 जानेवारी दरम्यान वर्ग करण्यात आला होता.
दरम्यान, महायुती सरकारच्या नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेची रक्कम 1500 वरुन 2100 रुपये करण्याचे आश्वासन देण्यात आलं होतं. आता जिल्हा परिषद निवडणुकीत देखील तेच आश्वासन दिलं जातंय.

























