Asia's Richest Person: मुकेश अंबानी पुन्हा एकदा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती (Richest Man in Asia) बनले आहेत. 'फोर्ब्स'ने मंगळवारी जारी केलेल्या 2023 च्या अब्जाधीशांच्या यादीत ही माहिती दिली. जागतिक यादीत अंबानींचे प्रमुख प्रतिस्पर्धी गौतम अदानी (Gautam Adani) यांची 24 व्या स्थानावर घसरण झाली आहे. 24 जानेवारी रोजी अदानी हे जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. त्यावेळी त्यांची संपत्ती 126 अब्ज डॉलर होती. अमेरिकन शॉर्ट-सेलर हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर त्याच्या संपत्तीत झपाट्याने घट झाली. अदानी यांची एकूण संपत्ती (Gautam Adani Net Worth) आता 47.2 अब्ज डॉलर्स असून अंबानी यांच्यानंतर दुसरे सर्वात श्रीमंत भारतीय असल्याची माहिती फोर्ब्सने दिली आहे.
जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मुकेश अंबानी नवव्या स्थानी
मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे 83.4 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील 9व्या क्रमांकाचे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहेत. फोर्ब्सने म्हटले आहे की, गेल्या वर्षी अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries Limited) ही 100 अब्ज डॉलरहून अधिक कमाई करणारी पहिली भारतीय कंपनी ठरली. रिलायन्सचा व्यवसाय तेल, दूरसंचार ते रिटेल अशा विविध क्षेत्रात पसरलेला आहे.
जगातील 25 सर्वात श्रीमंतांपैकी दोन तृतीयांश जणांच्या संपत्तीत घट
फोर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार, जगातील 25 सर्वात श्रीमंत लोकांची एकूण संपत्ती 2,100 अब्ज डॉलर इतकी आहे. वर्ष 2022 मध्ये हा आकडा 2,300 अब्ज डॉलर होता. गेल्या वर्षभरात जगातील टॉप 25 श्रीमंतांपैकी दोन तृतीयांश श्रीमंतांच्या संपत्तीत घट झाली असल्याचे फोर्ब्सच्या यादीत म्हटले आहे.
देशातील श्रीमंतांच्या यादीत कोण?
भारतात सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी पहिल्या स्थानावर तर गौतम अदानी दुसऱ्या स्थानावर आहेत. फोर्ब्सच्या यादीनुसार शिव नाडर हे तिसरे सर्वात श्रीमंत भारतीय आहेत. सायरस पूनावाला हे देशातील चौथे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. लक्ष्मी मित्तल हे पाचव्या स्थानावर आहेत.ओपी जिंदाल ग्रुपच्या सावित्री जिंदाल सहाव्या, सन फार्माचे दिलीप सांघवी सातव्या आणि डीमार्टचे राधाकृष्ण दमानी आठव्या क्रमांकावर आहेत.
कधीकाळी गौतम अदानी होते सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या स्थानी
गौतम अदानी यांची गणना आधी जगातील टॉप 3 श्रीमंतांमध्ये होत होती. ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनण्यापासून फक्त एक पाऊल मागे होते. तेव्हा त्यांच्या पेक्षा श्रीमंत फक्त टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क (Elon Musk Networth) आणि अॅमेझॉनचे जेफ बेझोस (Jeff Bezos Networth) हे होते. मागील वर्षी त्यांची ही स्थिती होती. यानंतर त्यांचे संपत्ती सातत्याने वाढत गेली. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकच्या आकडेवारी (Bloomberg Billionaires Index) अनुसार, अडाणी यांची एकूण संपत्ती (Gautam Adani Total Net Worth) 31 ऑक्टोबर 2022 मध्ये 143 बिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचली होती.